![]()
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात दोन दुचाकींच्या भीषण अपघातात भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत जवानाचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशसेवेची जबाबदारी पार पाडणाऱ्या तरुण जवानाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद भागवत नेहरकर (वय 30, रा. ढोकवजगाव) असे मृत जवानाचे नाव आहे. ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते. काही कामानिमित्त ते आपले सख्खे भाऊ गोपाळ नेहरकर यांच्यासोबत दुचाकीवरून मूळ गावाकडे जात होते. दरम्यान, गेवराई तालुक्यातील गढी परिसरात त्यांच्या दुचाकीचा दुसऱ्या दुचाकीशी समोरासमोर जोरदार अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही भाऊ रस्त्यावर फेकले गेले दोन्ही दुचाकींची धडक इतकी जोरदार होती की, अपघातानंतर गोविंद आणि गोपाळ नेहरकर हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या दुर्घटनेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या भीषण अपघातात गोविंद नेहरकर यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे भाऊ गोपाळ नेहरकर हे गंभीर जखमी झाले. जखमी भावाची प्रकृती चिंताजनक घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी गोपाळ नेहरकर यांना तातडीने गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, मृत जवान गोविंद नेहरकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ढोकवजगाववर शोककळा गोविंद नेहरकर हे भारतीय हवाई दलात कार्यरत असल्याने त्यांच्या मृत्यूच्या बातमीने ढोकवजगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाच्या सेवेत असलेल्या तरुण जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याने नेहरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच अपघातात एका भावाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत. हेही वाचा…. ‘तटकरेंचा राजकारणात पुन्हा जन्म होणार नाही’:महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर घणाघात, भरत गोगावलेंना दिला सल्ला रायगड जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. माणगाव येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. ‘येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रवादीची ब्याद राष्ट्रवादीतून बाहेर पडणार आहे. मात्र, बाहेर पडल्यास त्यांना शिवसेनेत घेऊ नका,’ असा सल्लाच त्यांनी मंत्री भरत गोगावले यांना दिला. दळवी यांच्या या विधानामुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा….
Source link
बीडमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक:हवाई दलातील 30 वर्षीय जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर