![]()
पुणे वनविभागाच्या ६८ हेक्टर क्षेत्रावरील मियावाकी रोपवन प्रकल्पात १२ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चाबाबत अनियमितता झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. कागदोपत्री निधी खर्च झाल्याचे दाखवले, मात्र अनेक ठिकाणी रोपवन नसल्याचे आणि काही ठिकाणची रोपे वाळल्याचे स्थळपाहणीत आढळल्याचा दावा प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला. जैन यांनी शासकीय कागदपत्रे, सॅटेलाइट छायाचित्रे, वृत्तपत्रांतील बातम्या आणि प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे आरोप केले. प्रकल्पातील नवीन कामांचा प्रस्ताव मार्चअखेरीस शासनाकडे पाठवला होता. २४ आणि २८ मार्चला मंजुरी मिळाली, ३१ मार्चला निधी आला आणि त्याच दिवशी संपूर्ण निधी खर्च झाल्याची नोंद केल्याचा दावा त्यांनी केला. जानेवारी ते मार्चदरम्यान पूर्वपावसाळी कामे पूर्ण झाल्याचे दाखवले असताना, वेताळ टेकडीवरील प्रत्यक्ष वृक्षतोड मे महिन्यात झाल्याचे पुरावे असल्याचे जैन म्हणाले. प्रकल्पात खतासाठी सुमारे सहा कोटी रुपये, कोकोपीटसाठी दोन कोटी रुपये, जेसीबीने खोदाईसाठी तीन कोटी रुपये आणि मजुरीसाठी ६० लाख रुपये खर्च झाल्याच्या नोंदी आहेत. खत आणि कोकोपीटची खरेदी फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली, पण त्यांचा वापर जानेवारीत दाखवल्याची विसंगती असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. या खर्चाची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणीही त्यांनी केली. वेताळ टेकडीवरील ग्लिरिसिडिया वृक्षतोडीसाठीच्या परवानग्या, रोपांची खरेदी, मजुरांची उपस्थिती आणि कामाच्या नोंदी तपासाव्यात, असे जैन म्हणाले. यावेळी भूषण रानभरे आणि प्रसन्न मोरे उपस्थित होते. या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी, आर्थिक लेखापरीक्षण आणि तांत्रिक स्थळपाहणी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. निविदा, बिले, मोजमाप पुस्तिका, मजुरांचे हजेरीपत्रक आणि वृक्षतोडीच्या परवानग्या सार्वजनिक कराव्यात. नियमबाह्य खर्चाची रक्कम दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांकडून वसूल करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Source link
मियावाकी प्रकल्पात निधी खर्चावर युवक काँग्रेसचा आक्षेप:पुण्यात 68 हेक्टर क्षेत्रासाठी 12 कोटी 68 लाख खर्च; मार्चमध्ये खर्चाची नोंद, मेमध्ये वृक्षतोड झाल्याचा आरोप