![]()
पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये उद्योजकाच्या वाहनावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या डिफेंडर गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केले. विशेष म्हणजे, गोळीबार होण्याच्या काही तास आधीच कोळेकर यांना इन्स्टाग्रामवरून फोन करून 2 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याने बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. घरासमोर उभ्या असलेल्या डिफेंडर गाडीवर गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीचे उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या शिवशंभोनगर येथील निवासस्थानाजवळ हा प्रकार घडला. शनिवारी (21 नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्ती कोळेकर यांच्या घराजवळ आल्या. त्यानंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या डिफेंडर गाडीवर दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. भरवस्तीत आणि उद्योजकाच्या घराजवळच हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, वाहनावर गोळ्या झाडण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. ‘मी डीके बोलतोय, दोन पेटी दे’; इन्स्टाग्रामवरून खंडणीचा फोन या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, गोळीबार होण्यापूर्वी राजन कोळेकर यांना खंडणीसाठी फोन आला होता. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना इन्स्टाग्रामवरून एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. ‘मी डीके बोलतोय, दोन पेटी दे’, असे म्हणत संबंधित व्यक्तीने 2 लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती कोळेकर यांनी दिली आहे. खंडणीची मागणी करणारा फोन आल्यानंतर अवघ्या दीड तासातच त्यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या वाहनावर गोळीबार झाला. त्यामुळे खंडणीसाठी धमकी देणारी व्यक्ती आणि गोळीबार करणारे हल्लेखोर एकच आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, अन्य तांत्रिक बाबींचाही आधार घेतला जात आहे. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असल्याची माहिती राजन कोळेकर यांनी दिली आहे. त्यामुळे फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, आरोपींची ओळख आणि हल्ल्यामागील नेमका हेतू याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. याआधी राणा सूर्यवंशी प्रकरणाची चर्चा; आता पुन्हा गोळीबार दरम्यान, बारामतीमध्ये यापूर्वीही उद्योजकावरील कथित हल्ल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. 18 ऑक्टोबर रोजी उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्यामुळे राज्यभरात चर्चा झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता दुसऱ्या व्यावसायिकाच्या वाहनावर गोळीबार झाल्याने बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील उद्योजकांना खंडणीसाठी धमकावणे आणि त्यानंतर गोळीबारासारख्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. राजन कोळेकर यांना आलेला खंडणीचा फोन आणि त्यानंतर झालेला गोळीबार यांचा संबंध आहे का, आरोपी कोण आहेत आणि या हल्ल्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. हेही वाचा…. ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे जयकुमार गोरेंनाच विचारा’:DCC बँकेच्या वादातून शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला वाद आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा उफाळून आला आहे. राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानाला मिश्कील शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे त्यांनाच विचारावे लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन,’ असा टोला देसाईंनी लगावला. त्यामुळे साताऱ्यातील महायुतीमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. सविस्तर वाचा…..
Source link
बारामतीत उद्योजकाच्या घराजवळच गोळीबार:खंडणीसाठी फोन केल्यानंतर काही तासांत हल्ला, डिफेंडर गाडीवर झाडल्या 2 गोळ्या