![]()
गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल 80 लाख रुपयांची उधळपट्टी का, असा सवाल काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला आहे. सतेज पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत चालली आहे, सरकारकडून एमपीएससीची भरती केली जात नाही. दुसऱ्या बाजूला उधळपट्टी करण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत; यातून सरकारची प्राथमिकता काय आहे, हे दिसते. काहीही करून आम्हाला सत्तेत बसायचे आहे, त्यासाठी लोकांनी दिलेला कौलसुद्धा ही लोकं मानायला तयार नाहीत. शासनाची भूमिका मांडण्यासाठी असलेल्या सरकारी वकिलांवर त्यांचा विश्वास नाही की काय, असे आता वाटायला लागले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी वकिलांना तब्बल 80 लाख रुपये मोजण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सहकार विभागाने या खटल्यासाठी ॲडव्होकेट रोहतगी यांना तब्बल 80 लाख रुपयांचे मानधन दिल्याच्या मुद्द्यावर सतेज पाटलांनी टोला लगावला आहे. 12 जणांसोबत 4 बॉडीगार्ड पाठवून बहुमत मिळवले सतेज पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या प्रक्रियेत ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांचा चेअरमन व्हायचे, हे साधे गणित आहे; त्यामध्ये इतर काही विषयच येत नाही. तुम्ही 12 लोकांना पाठवताना त्यांच्यासोबत 4 बॉडीगार्ड पाठवत बहुमत त्यांच्या पारड्यात पाडले. 12 लोकं आले असते, तर प्रशासक लावण्याची गरजच नाही. प्रशासकांचा कायदा गोकुळसाठी आला, जिल्हा बँकेसाठी नाही; म्हणजे ही लोकं सोयीने कायदा बदलतात, हे सिद्ध झाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, मराठा आरक्षण यांसारख्या मुद्द्यांसाठी मोठे वकील लावणं ठीक आहे; पण गोकुळसाठी वकील लावणं म्हणजे यांचा सत्तेत किती जीव अडकला आहे, हे यातून स्पष्ट होते. सरकार संवेदनशील नाही सतेज पाटील म्हणाले की, सरकार जर संवेदनशील असते, तर त्यांनी दिवाळीला 5 हजार रुपये दिले नसते, त्यांनी शेतकऱ्यांना 25 हजार रुपये दिले असते. आता चारा लावा, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. इथे पिण्यासाठी पाणी नाही आणि चाऱ्याला पाणी कुठून देणार, असा सवाल पाटील यांनी केला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांचा ताफा घेऊन लोकं येत आहेत, लोकांनी हे उधळून लावले आहे. हे कंत्राटदाराचा विचार करणारे सरकार आहे. सरकारचे दायित्व 13 कोटी जनतेसाठी दिसून येत नाही.चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी दोघांनी गोकुळसाठी कायदा करायला लावला. त्यांच्या पुढाकारातूनच हे सर्व काही सुरू आहे.
Source link
गोकुळच्या सत्तेसाठी कायदा बदलला, वकिलांना 80 लाख मोजले:हे कंत्राटदारांचा विचार करणारे सरकार, सरकारी वकिलांवर विश्वास नाही का?- सतेज पाटील