Headlines

Kolhapur Gokul Milk Row; Vijay Wadettiwar Slams Mahayuti Govt Over Funds


राज्यात एकीकडे भीषण दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला असताना, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सत्ता टिकवण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी महान्यायवादी ॲड. मुकुल रोहतगी यांना एका सुनावणीसाठी तब्बल 80 लाख रुपये मानधन

.

नेमके प्रकरण काय?

गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आणि न्यायालयीन लढाईची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला 13, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. गोकुळच्या उपविधींनुसार (बायलॉज) अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 14 संचालकांचा पाठिंबा आवश्यक होता. हा पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने गोकुळवर 4 शासन नियुक्त सदस्यांची नियुक्ती केली, ज्यामुळे सत्तेचे पारडे महायुतीच्या बाजूने झुकले.

उच्च न्यायालयात युक्तिवाद आणि 72 लाखांचे निव्वळ मानधन

या 4 नियुक्तींना स्थगिती मिळावी यासाठी समविचारी आघाडीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या खटल्याची दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी पार पडली. यावेळी समविचारी आघाडीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अभिषेक मनु सिंघवी यांनी, तर राज्य सरकारच्या वतीने ॲड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादासाठी सहकार विभागाने रोहतगी यांना 80 लाख रुपये मानधन मंजूर केले असून, त्यातून 10 टक्के प्राप्तिकर (टीडीएस) वजा करून 72 लाख रुपये अदा केले जाणार आहेत.

बाहुले बनलेल्या संचालकांसाठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी लाजिरवाणी – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले की, “राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना सत्तेच्या नशेत धुंद झालेले महायुती सरकार गोकुळ दूध संघाची सत्ता टिकवण्यासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 80 लाख रुपये वकिलांच्या फीवर उधळत आहे. आधी जनतेचा आणि सभासदांचा कौल डावलून सत्ता काबीज केली आणि आता तीच अनैतिक सत्ता टिकवण्यासाठी पैशांचा मनमानी वापर सुरू आहे. गोकुळमध्ये बाहुले बनून आलेल्या संचालकांच्या जीवावर सत्तेचा खेळ टिकवण्यासाठी लाखो रुपये वाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. या पैशांचा हिशोब कोल्हापूरचे स्वाभिमानी शेतकरी आणि जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही.”

“महाधिवक्ता सक्षम नाहीत का?” – सतेज पाटील व राजू शेट्टींचा सवाल

या निर्णयावरून आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकारला धारेवर धरले आहे.

साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर -सतेज पाटील

गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा हा खरा चेहरा आहे. एकीकडे शेतकऱ्यांना द्यायला आणि विकासकामांसाठी सरकारकडे निधी कमी पडतो, तर दुसरीकडे 4 शासन नियुक्त संचालकांचे समर्थन करण्यासाठी सरकारी तिजोरीतील 80 लाख रुपये वकिली शुल्कावर उधळले जात आहेत, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.

महाधिवक्त्यांना का डावलले? -राजू शेट्टी

सत्ताधाऱ्यांच्या क्षुद्र राजकारणासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. या प्रकरणी राज्य सरकारची बाजू राज्याच्या महाधिवक्त्यांनी मांडायला हवी होती. महाधिवक्ता सरकारची बाजू मांडण्यासाठी सक्षम नाहीत का, याचा खुलासा सरकारने करावा, अशी थेट मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केली बाजू

विरोधकांच्या या टीकेवर स्पष्टीकरण देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, “उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सहकार विभागाने सर्व शासकीय नियमांनुसारच त्यांचे मानधन अदा केले आहे.”

——————————————————

हेही वाचा…

उद्धव ठाकरेंना हटवून संजय राऊतच पक्ष ताब्यात घेणार: नवनाथ बन यांचा पलटवार, म्हणाले- सतेज पाटलांनी एका सुनावणीसाठी 1.80 कोटी उधळले

गोकुळ दूध संघाच्या खटल्यात सरकारी वकिलांना 80 लाख रुपये फी दिल्यावरून आक्षेप घेणारे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पुराव्यांसह गंभीर पलटवार केला आहे. “9 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीसाठी सतेज पाटील यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना दिल्लीतून विशेष चार्टर्ड फ्लाईटने बोलावले. चार्टर्ड फ्लाईटचे 1 कोटी रुपये आणि सिंघवींची फी 80 लाख रुपये असे तब्बल 1 कोटी 80 लाख रुपये एका दिवसात उधळले गेले; हा पैसा नेमका कोठून आला, याचा हिशेब सतेज पाटलांनी आधी महाराष्ट्राला द्यावा,” असे थेट आव्हान बन यांनी दिले. यासोबतच त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचे अलिबागमधील 10 सातबारा उतारे उघड करत राऊत, उद्धव ठाकरे, रोहित पवार आणि महापालिकेतील एफडी (FD) वादावर चौफेर प्रहार केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.