राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येत्या 12 डिसेंबर रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त राजकारणातून निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या चर्चांना राज्यात मोठे उधाण आले आहे. या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळ
.
शरद पवार आजही सक्रिय; अशा चर्चा करण्याचे कारण नाही
शरद पवार 12 डिसेंबरला निवृत्तीची घोषणा करतील आणि एनडीए प्रवेशाबाबत निर्णय होईल, या राजकीय वर्तुळातील चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार साहेबांची कार्यशैली आणि कामाचा उत्साह मी जवळून पाहिला आहे. ते सतत नवनवीन प्रकल्पांत कार्यरत असतात. अशा कार्यशील नेत्याच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नसून, अशा प्रकारच्या चर्चा करण्याचे कोणतेही कारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोयनेच्या 60 ते 80 टीएमसी पाण्यावरून विनाकारण वाद नको
कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावावरून महायुतीतील काही नेत्यांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या विरोधाचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे कोयनेचे पाणी आत्ताच वळवण्याचा विषय नाही, तर त्यावर केवळ प्राथमिक अभ्यास सुरू आहे. कोणताही अभ्यास न करता अनेक लोक या विषयावर बोलत आहेत.
समुद्रात वाहून जाणाऱ्या 60 ते 80 टीएमसी पाण्याचा वापर
कोयना प्रकल्प उभारल्यापासून गेल्या 50 ते 60 वर्षांत वीजनिर्मिती केल्यानंतर सोडले जाणारे सुमारे 60 ते 80 टीएमसी पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. या पाण्याचा एक थेंबही सिंचनासाठी (इरिगेशन) वापरला जात नाही. हेच वाया जाणारे पाणी उचलून मुंबईला देता येईल का, याचा अभ्यास सुरू आहे; जेणेकरून कोकणातील प्रकल्पांवरचा ताण कमी होऊन मुंबई स्वयंपूर्ण होईल.

कोकण व दुष्काळी भागांचाही विचार
कोकणातील लोकप्रतिनिधींनी या पाण्यात कोकणाचाही विचार व्हावा अशी मागणी केली असून, तोही विचार नक्कीच केला जाईल. तसेच, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागात आपण पाणी नेले आहे आणि यापुढेही नेणारच आहोत; त्यामुळे कोणाच्याही हक्काचे पाणी पळवले जाणार नाही, विनाकारण या टप्प्यावर वाद निर्माण करू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
परीक्षा गैरप्रकारांना चाप बसवण्यासाठी कठोर कायदा
राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माजी अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील आणि राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) यांचा समावेश असलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. परीक्षा पद्धती अधिक पारदर्शी करणे, परीक्षा केंद्रे निश्चित करणे आणि दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेला अधिक कडक कायदा करण्याचा सरकारचा मानस असून, येत्या हिवाळी अधिवेशनातच हे परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न राहील.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार
परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य (सिरियसनेस) राहावे यासाठी अर्ज करताना शुल्क आकारले जाईल; मात्र संबंधित विद्यार्थ्याने प्रत्यक्षात परीक्षा दिल्यानंतर हे शुल्क त्याला परत केले जाईल, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावर आर्थिक बोजा पडू नये, अशी महत्त्वाची शिफारस समितीने केली आहे.
कामठीतील मेट्रो स्थानकाचे नाव ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल मेट्रो स्टेशन’ होणार!
भारत-जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या नागपूर (कामठी) येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. या सोहळ्यासाठी जपानच्या भिक्खू संघाचे 30 भंते आणि जगभरातील 5000 विहारांचे प्रमुख असलेले 90 वर्षीय मोची दासान उपस्थित आहेत.
जागतिक वारसा केंद्र म्हणून विकास
मॅडम ओगावा आणि ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी उभारलेले ड्रॅगन पॅलेस टेम्पल आज जगाच्या नकाशावर आले आहे. दीक्षाभूमी, शांतीवन (जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू जतन केल्या आहेत) आणि ड्रॅगन पॅलेस या तिन्ही ऐतिहासिक स्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास महाराष्ट्र सरकार करत असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून यासाठी आवश्यक जमीनही दिली आहे. येथे 10 ते 12 लाख भाविक येत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी ड्रॅगन पॅलेसपर्यंत मेट्रो पोहोचवण्यात आली असून, या स्थानकाचे नाव ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल मेट्रो स्टेशन’ असे केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
—————————————-
हेही वाचा…
शरद पवार अजिबात निवृत्त होणार नाहीत!: त्यांच्या राज्यसभेची अजून 5 वर्षे बाकी आहेत; कोणी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवेल; सुप्रिया सुळे कडाडल्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’मध्ये (NDA) सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीने निवृत्तीच्या बातम्या येत असतील, तर ते अत्यंत संतापजनक आहे. शरद पवार निवृत्त होणार नाहीत; त्यांच्या राज्यसभेचा अजून 5 वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे, तेव्हा ते निवृत्त कसे होतील? कोणी निवृत्त व्हायचे, हे जनता ठरवणार,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी