![]()
विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? असा सवाल उपस्थित करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाटण तालुक्यातील तारळी उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच “लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?” असा एक पोवाडा सादर करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, भीमाशंकरचा प्रोजेक्ट झाला आणि हजारो झाडं तोडली. अतिदुर्मिळ झाडं, जी परत कधी जन्माला आपल्याला आपल्या जन्मात बघायला मिळणार नाहीत, अशी झाडं तोडली. त्यांचा विरोध केला होता. त्यानंतर तारळीचा जो प्रोजेक्ट आहे, जो 5675 चा फक्त 56.75 केला होता. आणि त्यांचं म्हणणं होतं की फक्त इन्व्हेस्टिगेशनसाठी तो खर्च होता. आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की तो 56 कोटीचाच होता. हा एवढा विरोधाभास त्यात आहे. त्यानंतर ईसी क्लिअरन्स (EC clearance), एन्व्हायर्नमेंटल क्लिअरन्स नव्हता, तरी दोन वर्षे तिथं काम चालू आहे. सह्याद्री पोखरला जात असताना वन व पर्यावरण विभाग अनभिज्ञ? पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, आपला सह्याद्रीचा डोंगर पूर्ण पोखरला आहे तरी पर्यावरण डिपार्टमेंटला माहीत नाही आणि ते म्हणतात आम्हाला वीज पाहिजे. वीज घ्याच, पण पर्यावरणाचा कुठलाच ऱ्हास न करता करायचं आहे, कुठलेही झाड न तोडता करायचं आहे. तर दुर्दैवाचा भाग, पर्यावरण खात्याला हे माहिती नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंटला माहिती नाही. मी फॉरेस्ट मिनिस्टरला भेटलो, ते म्हणाले आम्हाला माहिती नाही. ईसीसीए (ECCA) वाले सगळ्यात मेन असतात, ते म्हणतात की एनबीडब्ल्यूएलचं (NBWL) परमिशन नसताना सुद्धा हे काम सुरूच होऊ शकत नाही, तरी झालं होतं. मग खालचे जे असतात सहा जिल्ह्याचे प्रमुख, ते म्हणतात की आमची परमिशन नव्हती, हे म्हणतात आम्हाला माहिती नव्हतं. आणि पोलीस-कलेक्टर म्हणतात की याची परमिशन खरं तर बंद करायची होती, त्यांनीच करायला पाहिजे होती. अदानी ग्रीन एनर्जीला ब्लॅकलिस्ट करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी पोलिस तक्रार केली तर आपले इथले पोलिस एसपी आपली तक्रार घेत नाहीत. नोटीस दिली आहे फक्त. तर या सगळ्या प्रकाराला त्यांनी सिरियसली घ्यावं. अदानी ग्रीन एनर्जीवर ताबडतोब ॲक्शन घ्यावी. त्यांच्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये काढावं. त्यांची कंपनीचा हा प्रोजेक्ट रद्द करावा. असे प्रोजेक्ट त्यांना देऊ नयेत. आणि पुढे झाड न तोडता, पर्यावरणाचे नुकसान न होता जे कोणते पीएसपी (PSP) प्रोजेक्ट करायचे असतील ते त्यांनी करावे. आणि त्याच्यासाठी जी जाहीर नोटीस आज सर्व महाराष्ट्रातल्या झाडांच्या वतीनं, सह्याद्रीच्या झाडांच्या वतीनं, सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या वतीनं, तुमच्या पत्रकार बंधूंच्या वतीनं मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि सगळ्या जबाबदार कंपन्यांना ही जाहीर नोटीस काढत आहे ती आज तुमच्यासमोर आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले. झाडे वाचवण्यासाठी 3 तारखेला पुण्यात भव्य मोर्चाचे आवाहन पुढे सयाजी शिंदे म्हणाले, 3 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो तिथे आहे, पुणे स्टेशनपासून ते विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यापर्यंत मोर्चा काढणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी—12 कोटी असतील, त्यातले 13 कोटी लोकांनी या. पण याला तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्याला झाडे वाचवायची आहेत, पुढची पिढी वाचवायची आहे आणि सगळ्यांना आनंदात ठेवायचे आहे. तर जरूर याचा गांभीर्याने विचार करा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. या नंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारच्या विरोधात तसेच पर्यावरणाच्या विरोधात होणाऱ्या या कामांवर थेट एक पोवाडा सादर केला… पोवाडा लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?
लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?
ह्या खात्याला माहित नाही, त्या खात्याला माहित नाही,
ह्या खात्याची हद्दच नाही, त्या खात्याची हद्दच नाही.
लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई? वन खात्याचा गोंधळ झालाय, पोलीस खात्याचा गोंधळ झालाय,
पर्यावरणाचा बी गोंधळ झालाय, गोंधळात गोंधळी कलेक्टर झालाय.
लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई? अधिकारी कपटी, भरतोय मापटी, लढवतो शक्कल, गहाण अक्कल,
मंत्र्याच्या गाडीचं गाढव हांडगं, उकिरडं फुगतंय निव्वळ कोडगं.
लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई? जंगल तोडून जंगल वाचवू, माणसं मारून माणसं वाचवू,
शिक्षणाला तर धडा शिकवू, विकासाला तर घोडाच लावू.
लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई? दाखवा दाखवा कितीबी कायदा, उठवा उठवा कितीबी फायदा,
दाखवा दाखवा कितीबी कायदा, उठवा उठवा कितीबी फायदा,
छत्रपतींचं येऊ द्या वारं, सह्याद्रीचं उठू द्या खोरं,
जय जिजाऊ, जय शिवाजी! लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?
लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई? विनापरवाना उत्खननातून 1 हजार कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्यांमधील अटींचे पालन झाले नसल्याचा, तसेच दगड, मुरूम आणि जांभा दगडाचे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना उत्खनन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या उत्खननातून शासनाचा तब्बल एक हजार कोटी रुपयांपर्यंतचा महसूल बुडाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. स्वामित्वधन, दंड आणि अन्य शासकीय देणी अद्याप वसूल झालेली नसल्याचे कायदेशीर नोटिशीत नमूद आहे. प्रशासकीय उदासीनतेनंतर प्रकरण कायदेशीर पातळीवर या प्रकरणाचे गांभीर्य केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित नसून पर्यावरणीय परवानग्यांच्या अंमलबजावणीचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. वन विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कथित उल्लंघनांवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. तक्रारी आणि कागदोपत्री पुरावे सादर करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने हा विषय आता कायदेशीर पातळीवर नेण्यात आला आहे. सात दिवसांत कारवाई करण्याची कायदेशीर नोटीस सर्वोच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड श्रीराम पिंगळे यांच्यामार्फत संबंधित जिल्हा व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना जाहीर नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत प्रकल्पातील कथित नियमबाह्य काम थांबवावे, उत्खननाचे अधिकृत मोजमाप करून शासनाची थकबाकी वसूल करावी आणि जबाबदारांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जबाबदारीचा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तारळी प्रकल्पाच्या निमित्ताने शासनाचा महसूल, पर्यावरणीय नियम आणि प्रशासकीय उत्तरदायित्व या तीन मुद्द्यांवर मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. आता या आरोपांवर अदानी कंपनी आणि संबंधित शासकीय यंत्रणा काय स्पष्टीकरण देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Source link
'अदानी ग्रीन एनर्जीला ब्लॅकलिस्ट करून तारळी प्रकल्प रद्द करा':सयाजी शिंदेंचा एल्गार, थेट पोवाडा गात सरकारवर साधला निशाणा