![]()
विदर्भातील १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुकारलेल्या आंदोलनाला सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला असून, शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा निव्वळ राजकीय पतंगबाजी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कृषिमंत्र्यांकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसतील तर दत्ता भरणे यांनी राजीनामा देऊन आमच्यासोबत रस्त्यावरच्या लढाईत उतरावे, असे थेट आव्हानही त्यांनी दिले आहे. रोहित पवार म्हणाले, भूमिका घेत असताना सामान्य लोकांच्या बाजूनेच भूमिका घेतली आणि ही भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही शशिकांत शिंदे साहेबांना विचारा, पवार साहेबांना विचारा, सुप्रिया ताईंना विचारा, सगळ्यांचं मत हेच येईल की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला, शेतमजुराला आणि महिलांना तिथे न्याय मिळायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हे जे विषय आम्ही आंदोलनामध्ये घेतले ते महत्त्वाचे असल्यामुळे पार्टी पाठिंबा देणारच असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच आंदोलनाची घोषणा बरेचशे नेते हे नाराज असल्याचं कळत आहे, तसं सलील देशमुखांच्या समोर सुप्रिया सुळे यांनी देखील एक खंत किंवा जी नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे असं देखील कळत आहे. यावर रोहित पवार म्हणाले, सलीलजी देशमुख माझ्याबरोबर होते, स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये होते. विदर्भाचे जे लोकसभेचे आपले खासदार आहेत अमरजी काळे, ते तिथे होते वर्ध्याचे. तर ते सर्व तिथे असताना आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स आम्ही संध्याकाळी घेतली. प्रेस कॉन्फरन्स होण्यापूर्वी आम्ही आमचे जे विदर्भातले सर्व पदाधिकारी आहेत १२० ते १३० त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष या सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांचं मत आलं की आपल्याला मोठं आंदोलन करावं लागतंय, अशी माहिती पवार यांनी दिली. ‘आता नाही तर कधीच नाही’ पुढे रोहित पवार म्हणाले की, याचे कारण असे की प्रश्न अतिशय हलाखीचे झालेले आहेत. १९७२ पेक्षा वाईट दुष्काळ आता आहे. कारण १९७२ ला आपण बघितलं असेल तर रब्बी १७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, आता फक्त १० लाख हेक्टरवर पेरणी तिथे झालेली आहे किंवा १७ टक्के पेरणी झाली असेल. तर आपल्याला आंदोलन घ्यावंच लागेल आणि तीन वर्षांत विदर्भाला अधिवेशन नसल्यामुळे ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेमध्ये सर्व पदाधिकारी असल्यामुळे संध्याकाळी आम्ही ती गोष्ट त्या ठिकाणी जाहीर केली. आंदोलनात पक्षाचे चिन्ह नाही; सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण पक्षातून तुम्हाला हवं तसं सहकार्य मिळतंय का? कारण यावरून बरेचशे प्रश्न विरोधक पण उपस्थित करतायत. काँग्रेस तुम्हाला पाठिंबा देत असेल, अतुल लोंढे म्हणाले की तुमच्या ट्रॅक्टर आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. यावरून विरोधक म्हणतात की काँग्रेसच्या तुम्ही जवळ चालले आहात. यावर रोहित पवार म्हणाले की, मुद्दा तुम्ही समजून घ्या की जेव्हा एमपीएससीचं आंदोलन आम्ही घेतलं होतं, विद्यार्थ्यांनी घेतलं होतं, आम्ही पाठिंबा दिला होता, त्याच्यावर पक्षाचे चिन्ह आपण कुठे लावलं नव्हतं. त्या व्यासपीठावर सर्व पक्षातले नेते आले. त्याचबरोबर पंढरपूरला आपण शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं होतं, तिथे सुद्धा आपण कुठल्याच पक्षाचं चिन्ह वापरलं नव्हतं, सर्व पक्षातले नेते तिथे आले होते. हे एका पक्षाचे नव्हे, तर शेतकरी आणि शेतमजुरांचे आंदोलन तसेच परवा नागपूरमधून शेतमजुराला, शेतकऱ्याला, ज्या बचतगटाच्या महिला आहेत, मायक्रो फायनान्सचे अडचणीत आलेले लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा जो काढलेला आहे तिथे सुद्धा आम्ही चिन्ह हे वापरलं नव्हतं. आणि ते चिन्ह वापरत नसताना आम्ही हेच आवाहन केलं होतं की हे आंदोलन सगळ्यांचं आहे ना, याला पाठिंबा तुम्ही द्यावा. आमच्या पक्षाचा पाठिंबा आहेच आणि त्याच्यात अतुल लोंढे जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांनी स्वतः काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिला. हेच तर आपल्याला पाहिजे. हे आंदोलन फक्त एका पार्टीचं नसून हे शेतकऱ्याचं, शेतमजुराचं आहे आणि त्या अनुषंगाने जे-जे पक्ष या लोकांची प्रामाणिकपणे भूमिका घेतील त्यांचं हे आंदोलन असल्यामुळे, त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं आमचं सगळ्यांचं मत आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा निव्वळ राजकीय पतंगबाजी पुढील महिन्यात शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार निवृत्तीची घोषणा करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाईल अशी राजकीय वर्तुळात सध्या खूप चर्चा, यावर रोहित पवार म्हणाले, ती फक्त चर्चाच आहे ना. आदरणीय पवार साहेब गेले ६५ वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आलेले आहेत आणि नेहमी त्यांच्या निर्णयामध्ये, त्यांच्या कामामध्ये कोण केंद्रबिंदू राहिलेला आहे, तर महाराष्ट्रातला सामान्य नागरिक राहिलेला आहे. त्यामुळे हे जे काही राजकीय पतंग उडवणारे जे कोणी लोक असतील, खास करून सत्ताधारी पक्षातले त्यांनी काही केलं तरी पवार साहेबांचा या महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठीचा लढा हा अजून अनेक वर्ष त्या ठिकाणी चालूच राहील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. ‘नमो’ योजनेच्या विधानावरून कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कृषिमंत्री दत्ता भरणे तसेच रमेश कदम यांनी रोहित पवार हे कोण आहेत आम्हाला माहिती नाहीये आणि पवार आडनाव काढलं तर ते झिरो आहेत, अशी टीका केली होती. यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, ज्यांचं नाव तुम्ही घेतलं ते कोण आहेत आधी तुम्ही मला सांगा, मग मी त्यांच्यावर वक्तव्य करेन. आता दत्ता भरणे जे आहेत कृषिमंत्री, त्यांनी धक्कादायक खुलासा केलेला आहे. राज्य सरकारतर्फे दिली जाणारी ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ आणि दुष्काळाची अग्रिम रक्कम ही एकच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. जर असा खुलासा केला असेल तर वेळ घालवू नका, राज्यपालांचे कार्यालय कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिथे जायचं आणि तुम्ही राजीनामा तिथं द्यायचा, अशी खोचक टीका पवारांनी केली आहे. राजीनामा देऊन रस्त्यावर उतरा रोहित पवार म्हणाले की, नमो योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांना, माझा अंदाज ५५ टक्के शेतकऱ्यांना मिळत नाहीयेत. गेले तीन-तीन महिने झालेत नाहीतर तीन-तीन हप्ते झाले अजून पर्यंत त्यांना मिळालेले नाहीत. त्याच्याच बरोबर दत्ता भरणे साहेबांना जेव्हा केव्हा प्रश्न विचारला जातो मदत किती देणार, ते म्हणतात मुख्यमंत्री साहेबांना विचारावं लागेल. शेतकऱ्याला अडचणीतून कसं सोडवायचं, मुख्यमंत्री साहेबांशी आपल्याला बोलावं लागेल. मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब आणि भाजप मुद्दामून दत्ता भरणेंना आणि अजित दादांच्या पक्षाला अडचणीत आणत आहेत. एवढ्या अडचणीत जाण्यापेक्षा दत्ताभाऊ भरणेंना मी विनंती करेल की आमच्याबरोबर रस्त्याची लढाई लढायला तुम्ही या आणि आपण शेतकऱ्याच्या वतीने, शेतमजुराच्या वतीने तिथं लढूया. धाडस असेल तर निर्णय घ्या. निर्णय घ्यायचे तुम्हाला अधिकार नसतील तर गप्प बसून तिथं राज्यपालांकडे जाऊन राजीनामा द्या, एवढी विनंती एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी करेल, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
Source link
रोहित पवार म्हणाले- शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा निव्वळ पतंगबाजी:दुष्काळाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याचाही केला दावा