![]()
शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 11 दिवसांपासून तुपकर जिल्ह्यातील गावागावांत जाऊन शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत आहेत. घाटावरील चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या तालुक्यांमध्ये यात्रेला मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होत आहेत. 4 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणारा एल्गार महामोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी गावोगावी एकजूट केली जात आहे. त्यामुळे या महामोर्चाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दुष्काळ संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयसिंह राजपूत यांच्या मलकापूर येथील स्मारकाला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गेल्या 11 दिवसांपासून तुपकर जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देत आहेत. गावखेड्यांसह वाड्या-वस्त्यांवर जाऊन ते नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. या यात्रेत शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. ही संघर्ष यात्रा केवळ दुष्काळी मदत, सोयाबीनला योग्य भाव, पीकविमा आणि पीककर्ज या मागण्यांपुरती मर्यादित नाही. तर गावगाड्यातील शेतकरी आणि शेतमजुरांचे अस्तित्व टिकवण्याचा हा लढा असल्याचे तुपकर सांगत आहेत. शेती आणि शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या जीवन-मरणाच्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे आवाहन ते करीत आहेत. पद, प्रतिष्ठा, पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून शेती आणि मातीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन त्यांच्या भाषणातून केले जात आहे. या आवाहनाला गावागावांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गावोगावी सभा, हजारो शेतकऱ्यांचा सहभाग 22 नोव्हेंबर रोजी उकळी, सुकळी, मेहकर, अंजनी, अंथरूड, वरुड, घाटपुरी, टेंभुर्णी, खेड, विश्वी, जनुना, पांगरखेड, बेलगाव, गोहोगाव आणि तांदळे या गावांमध्ये संघर्ष यात्रा पोहोचली. तर 23 नोव्हेंबर रोजी भुमराळा, आरेगाव, जवळा, चिंचोली बोरे, वडगाव तेजन, शाळा, देऊळगाव कुंभार, चिंचोली सांगळे, पारडा, दराडे, येवती आणि झरा या गावांना भेटी देण्यात आल्या. या दौऱ्यात भुमराळा आणि गोहोगाव दांदडे येथे विराट सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांना शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. 4 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. दररोज हजारो शेतकरी यात्रेत सहभागी होत असल्याने महामोर्चासाठी वातावरणनिर्मिती होत आहे. गावागावातून मदतनिधीचा ओघ सुरू दुष्काळ संघर्ष यात्रेला केवळ जनसमर्थनच मिळत नाही, तर गावागावातून आर्थिक मदतीचाही ओघ सुरू झाला आहे. रविकांत तुपकर यांनी पांगरखेड तेली येथील त्यांचे जिवलग सहकारी स्वर्गीय संदीप नालिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संदीप नालिंदे यांच्या मातोश्री आणि बंधू दीपक नालिंदे यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संघर्ष यात्रेसाठी 11 हजार रुपयांचा निधी दिला. आरेगाव येथील संतोष धोंडजी टाले यांनी 2,100 रुपये, माजी सरपंच शंकरराव टाले यांनी 1,100 रुपये, संजय दत्तात्रय टाले यांनी 1,100 रुपये, तर गोहोगाव दांदडे येथील डॉ. वसंत बोरकर यांनी 11 हजार रुपयांचा निधी दिला. शेतकरी चळवळीवरील विश्वासातून नागरिक स्वतःहून मदत करीत असल्याचे तुपकर यांनी सांगितले. ही मदत केवळ आर्थिक योगदान नसून शेतकरी चळवळीवरील विश्वासाचे प्रतीक आहे. हाच विश्वास सोबत घेऊन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्काचा लढा अधिक ताकदीने पुढे नेणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुष्काळ संघर्ष यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता 4 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणारा एल्गार महामोर्चा किती मोठा होणार, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. ‘अदानी ग्रीन एनर्जीला ब्लॅकलिस्ट करून तारळी प्रकल्प रद्द करा’:सयाजी शिंदेंचा एल्गार, थेट पोवाडा गात सरकारवर साधला निशाणा विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? असा सवाल उपस्थित करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाटण तालुक्यातील तारळी उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच “लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?” असा एक पोवाडा सादर करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा…..
Source link
रविकांत तुपकरांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला शेतकरी-शेतमजुरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:4 डिसेंबरच्या एल्गार महामोर्चासाठी गावोगावी एकजूट