![]()
शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्यानंतर 17 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश असून, बाधितांना मळमळ, उलट्या, अतिसार, ताप आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्याने सर्वांना तातडीने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या बाधितांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, खाद्यपदार्थांच्या दर्जाचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरातील एका दुकानातून काही नागरिकांनी शोरमा खाल्ला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही रुग्णांना ताप आणि पोटदुखीचाही त्रास जाणवू लागला. सुरुवातीला एकाच कुटुंबातील चार ते पाच जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याकडून शोरमा खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. त्याच परिसरातील इतर नागरिकांनीही संबंधित दुकानातून शोरमा खाल्ल्याचे समजल्यानंतर रुग्णालय प्रशासन सतर्क झाले. लहान मुलांसह महिलांचाही समावेश या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने उपचारांची व्यवस्था केली. बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला काही रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर इतर बाधित नागरिकही रुग्णालयात येऊ लागले. एकूण 17 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाधितांमध्ये चार ते पाच महिला, पाच ते सहा लहान मुले आणि दोन पुरुष रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. रुग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एकाच कुटुंबातील चार ते पाच जण उपचारासाठी आले होते. त्यांनी वंजारपट्टी परिसरातील दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर रात्रभर उलट्या, जुलाब, ताप आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगितले. त्यानंतर इतर नागरिकांनाही असाच त्रास होत असल्याची माहिती मिळाली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, रुग्णालयात बाधित नागरिक येण्याचे प्रमाण वाढले होते. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. एफडीएच्या कारवाईनंतरही अन्नसुरक्षेचा प्रश्न राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाणावळी आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि अन्न सुरक्षा परवान्यांच्या नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांवर परवाना निलंबनासह कारवाईदेखील करण्यात आली आहे. असे असतानाही भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. परवाना निलंबित केल्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. भिवंडीतील या घटनेनंतर संबंधित शोरमाच्या दुकानातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि साठवणुकीबाबत तपासणी होणार का, याकडे लक्ष लागले आहे. विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीतून तसेच पुढील चौकशीतून याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा…. ‘अदानी ग्रीन एनर्जीला ब्लॅकलिस्ट करून तारळी प्रकल्प रद्द करा’:सयाजी शिंदेंचा एल्गार, थेट पोवाडा गात सरकारवर साधला निशाणा विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? असा सवाल उपस्थित करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाटण तालुक्यातील तारळी उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच “लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?” असा एक पोवाडा सादर करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा…..
Source link
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा:लहान मुलांचाही समावेश, रुग्णालयात उपचार सुरू