![]()
हिंजवडी आयटी पार्क परिसरात कार्यरत असलेल्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता कोमल राजेंद्र डहाके यांच्या हत्येप्रकरणी विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळीच मदत मिळावी, यासाठी आयटी कंपन्यांनी आपल्या आस्थापनांमध्ये मदत कक्ष सुरू करावेत आणि समुपदेशन व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५६/२६ दाखल आहे. स्त्री आधार केंद्राच्या आश्लेषा खंडागळे व रंजना पवार तसेच हिंजवडी महिला दक्षता समितीच्या सदस्या साधना साखरे व वंदना साखरे यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपास अधिकारी संदीप वांगणेकर यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळच्या वर्धा येथील कोमल आणि या प्रकरणातील आरोपी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे (वय ३२) यांची तीन वर्षांपासून ओळख होती. शुभम हाही सॉफ्टवेअर अभियंता असून दोघांच्या विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांची संमती होती. शुभमचे दुसऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद होत होते. रविवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर शुभमने कोमल यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कोमल यांचा मृत्यू झाला. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी घरापासून दूर राहून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका होतकरू तरुणीला अशा प्रकारे जीव गमवावा लागणे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे, अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
Source link
कोमल डहाके हत्या प्रकरणी डॉ. गोऱ्हेंनी पोलिसांकडे पाठपुरावा केला:आयुक्त विनय चौबे यांची भेट; आयटी कंपन्यांत कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष, समुपदेशन आणि मार्गदर्शनाची सुविधा सुरू करण्याची मागणी