![]()
शेतीतील धान विक्रीच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान पत्नीच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे उघडकीस आली आहे. पतीने आधी घराच्या खोलीचा दरवाजा बंद केला, त्यानंतर टीव्हीचा आवाज मोठा केला आणि पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिची हत्या केली. विशेष म्हणजे, हत्येच्या वेळी मुलगा घरातच उपस्थित होता. रामकला जागेश्वर शिवणकर (वय 44) असे मृत महिलेचे नाव असून, जागेश्वर आसाराम शिवणकर (वय 48) असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे चिखली गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवणकर कुटुंबाकडे सुमारे सव्वा एकर शेती आहे. रामकला आणि जागेश्वर यांचा मुलगा रोहन ऊर्फ तेजस हा साकोली येथे एमबीएचे शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच पार्टटाइम नोकरीही करतो. तो कुटुंबाच्या शेतीची जबाबदारीदेखील सांभाळत होता. यंदाच्या हंगामात शेतातून 14 खंडी धानाचे उत्पादन झाले होते. त्यापैकी 6 खंडी धानाची विक्री करण्यात आली होती. मात्र, विकलेल्या धानाचे पैसे अद्याप मिळाले नव्हते. याच पैशांवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. तुळशी विवाहानंतर घरात वादाची ठिणगी 23 नोव्हेंबर रोजी शिवणकर कुटुंबात तुळशी विवाहाचा कार्यक्रम पार पडला होता. कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक घरी परतल्यानंतर रात्री जागेश्वरने मद्यप्राशन केले. त्यानंतर रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास धान विक्रीच्या पैशांवरून त्याने पत्नी रामकला यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत असल्याचे पाहून मुलगा रोहन याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागेश्वरने त्यालाही शिवीगाळ केली. घरातील वातावरण तणावपूर्ण झाले असतानाच लहान मुलगा साहिल याने पुढाकार घेत दोघांमधील वाद शांत केला. यानंतर रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी झोपण्यासाठी खोलीत गेले. सुरुवातीला सर्व काही शांत असल्याचे दिसत होते. मात्र, याच दरम्यान जागेश्वरने घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला. त्यानंतर त्याने पुन्हा मद्यप्राशन केले आणि खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. टीव्हीचा आवाज मोठा असल्याने खोलीत नेमके काय घडत आहे, याची बाहेर असलेल्या कुटुंबीयांना कल्पना आली नाही. याच संधीचा फायदा घेत जागेश्वरने कुऱ्हाडीने पत्नी रामकला यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रामकला यांचा मृत्यू झाला. सकाळी दरवाजा उघडताच पळ काढला; मुलांना दिसला आईचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी भरण्यासाठी मुलगा रोहन आणि त्याचा मामेभाऊ मयूर हे रामकला यांना उठवण्यासाठी खोलीच्या दरवाजाजवळ गेले. त्यांनी दरवाजा ठोठावून आईला आवाज दिला. त्यावेळी जागेश्वरने खोलीचा दरवाजा उघडला. मात्र, त्याने मुलांशी कोणताही संवाद न साधता थेट शेताच्या दिशेने पळ काढला. त्याच्या या संशयास्पद वागण्यामुळे मुलांना शंका आली. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता रामकला या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. तसेच पलंगाखाली रक्ताने माखलेली कुऱ्हाडही आढळून आली. हा प्रकार पाहून मुलांना मोठा धक्का बसला. आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, या प्रकरणातील आरोपी पती जागेश्वर शिवणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धान विक्रीच्या पैशांवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद एवढ्या टोकाला कसा पोहोचला, तसेच हत्येमागील नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने दोन मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा…. इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द:पुण्यात FDA ची मोठी कारवाई, परवानगीशिवाय उत्पादन आणि विक्री केल्याचे उघड तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून धडाकेबाज कारवायांचे सत्र सुरूच ठेवले आहे. सुरुवातीला हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर आता मुंढे यांनी आपला मोर्चा औषध उत्पादन कंपन्यांकडे वळवला आहे. पुण्यातील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ या कंपनीवर एफडीएने मोठी कारवाई करत तिचा औषध उत्पादन परवाना रद्द केला आहे. कंपनीची नऊ औषधे अप्रमाणित आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा….
Source link
धानाच्या पैशांवरून वाद:टीव्हीचा आवाज वाढवून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, मुलगा घरी असतानाच पतीचे क्रूर कृत्य