Headlines

"पैस' खांबाच्या साक्षीने वारकऱ्यांवर होणार मोफत उपचार:डॉ. जगधने




प्रतिनिधी | नेवासे ज्या पैस खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रकट केली, त्या पवित्र खांबाच्या साक्षीने आज एका डॉक्टरने मानवतेची शपथ घेतली. वैशाख शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या महाआरतीनंतर डॉ. जगधने यांनी आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकरी भक्तांना मोफत उपचार देण्याचा संकल्प जाहीर केला. माऊलींच्या दर्शनाने मिळालेली ही अनुभूती असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता साखर कामगार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जगधने आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबाची महाआरती झाली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात अवघी नेवासा नगरी भक्तीत न्हाऊन निघाली होती. महाआरतीनंतर भाविकांशी संवाद साधताना डॉ. जगधने भावूक झाले होते. ते म्हणाले, आरतीनंतर मला साक्षात माऊलींचे दर्शन झाल्याची अनुभूती आली. माऊलींनी जणू मला आदेशच दिला की, तुझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकरी भक्तांची सेवा कर. त्यानुसार आता वारकऱ्यांवर मोफत उपचार केले जातील.” त्यांच्या या घोषणेचे मंदिर परिसरात टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. वै. गुरुवर्य बन्शी महाराज तांबे यांच्या आशीर्वादाने आणि मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने मंदिर परिसरात ‘संत ज्ञानेश्वर महाराज प्राथमिक उपचार केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. डॉ. जगधने यांच्या वतीने भाविकांना २० किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी मंदिराचे महंत देविदास बाबा म्हस्के आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने डॉ. जगधने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी औटी, शिवाजी होन, बनकर, आशिष कावरे, डॉ. शंकर शिंदे, डॉ. भाऊसाहेब घुले उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *