Headlines

ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात:राजकीय चर्चा, ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत




राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पल्लवी पाटील यांचा नुकताच अपघात झाला असून त्या सध्या उपचार घेत आहेत. ही माहिती मिळताच शिंदे यांनी मंगळवारी थेट मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालय गाठत त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांची ही भेट केवळ औपचारिक नसून त्यांच्या स्वभावातील माणुसकीचा प्रत्यय देणारी असल्याचे बोलले जात आहे. राजकारणात कट्टर विरोधक असले तरी अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाण्याची त्यांची शैली यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाली आहे. संजय दिना पाटील यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली. या भेटीमुळे राजकीय भिंती ओलांडणारा एक वेगळाच संदेश गेला आहे. याआधीही एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांबाबत सहानुभूती दाखवलेली आहे. खासदार संजय राऊत आजारी असताना त्यांनी आमदार सुनील राऊत यांना फोन करून विचारपूस केली होती. त्यामुळे शिंदे हे केवळ आपल्या पक्षापुरते मर्यादित न राहता सर्वांशी संवाद ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. याच पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांच्या पत्नीची घेतलेली भेटही त्याच परंपरेचा भाग मानली जात आहे. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत या भेटीकडे वेगळ्याच नजरेतून पाहिले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशा वेळी शिंदे यांनी वेळ काढून खासदारांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत आले आहे. या भेटीमागे केवळ मानवतेचा विचार आहे की त्यामागे काही राजकीय गणित आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातील काही खासदारांनी गुप्तपणे एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा जोर धरत होती. एप्रिल महिन्यात मध्यरात्री ठाण्यातील व्होल्टास परिसरात ही बैठक झाल्याचे सांगितले जात होते. या बैठकीत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर काही खासदार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाल्याची माहिती समोर आली होती. नवे समीकरण निर्माण होणार का तथापि, ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी या बैठकीच्या चर्चांना फेटाळून लावले होते. तरीदेखील या भेटीनंतर पुन्हा एकदा त्या चर्चांना हवा मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या पावलामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी ही भेट मानवी दृष्टीकोनातून पाहिली जात असली, तरी तिचे राजकीय परिणाम काय होतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *