![]()
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कमिशनच्या आमिषाने सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्याची परवानगी दिल्याप्रकरणी पंपाच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ ५० रुपयांच्या कमिशनसाठी हे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते. याप्रकरणी एका ४३ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पंपाचा व्यवस्थापक सुनील सुंदरराव मोरे (३१, रा. लोणी काळभोर, पुणे; मूळ रा. पोथरा, जि. बीड), मोहन भरत सोनार (रा. गुलटेकडी, पुणे) आणि करण चौधरी (रा. राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार १६ मार्च ते २ मे दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण चौधरी याने व्यवस्थापक मोरे याला पेट्रोल पंपाचा स्कॅनर पाठवण्यास सांगितले होते. या स्कॅनरचा वापर करून तो पंपाच्या बँक खात्यावर पैसे पाठवत असे. त्यानंतर मोहन सोनार पंपावर येऊन खात्यात पैसे जमा झाले आहेत का, याची चौकशी करत असे. मोरे मोबाईलवरील ‘मोबिक्विक’ ॲपवर व्यवहारांची तपासणी करत असे. रक्कम जमा झाल्यानंतर पंपावरील रोख रक्कम सोनारला दिली जात होती. या व्यवहारांसाठी दर १० हजार रुपयांमागे २०० रुपये कमिशन मिळत होते. त्यापैकी ५० रुपये मोरे स्वतःकडे ठेवत होता, तर उर्वरित १५० रुपये इतर कामगारांमध्ये वाटले जात होते. तक्रारीनुसार, व्यवस्थापक मोरे याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीतील तब्बल ७ लाख १९ हजार १३ रुपये स्वीकारले आहेत. मार्केट यार्ड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
पुणे पेट्रोल पंपावर सायबर फसवणूक:व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा, कमिशनसाठी बँक खात्यांचा वापर