Headlines

निदा खान प्रकरण तापलं; मतीन पटेलवर कारवाईनंतर इम्तियाज जलील आक्रमक:एमआयएमला लक्ष्य केलं जातंय? प्रशासनावर निशाणा




नाशिकमधील कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाने पहाटेच्या सुमारास नारेगाव परिसरातील मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. काही दिवसांपूर्वीच या घराला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रशासनाने थेट कारवाई केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापले आहे. कारवाईदरम्यान मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी वेगळाच पवित्रा घेतला. महापालिकेचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहोचताच कुटुंबीय हार घेऊन स्वागतासाठी उभे राहिले होते. घरावर नोटीस लावण्यात आल्यानंतरही उत्तर देण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर नियमांनुसार कारवाई करत घर जमीनदोस्त करण्यात आले. या संपूर्ण घडामोडीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या कारवाईनंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मध्यरात्री नारेगाव परिसरात जाऊन नागरिक आणि समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी उपस्थितांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. मी शेवटच्या आशेने येथे आलो आहे. पुढच्या वेळी येईन तेव्हा मतीन पटेल माझ्यासोबत असतील, असे वक्तव्य करत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी महापालिका पथकाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने सात दिवसांचा अवधी दिला असेल तर महापालिकेने 24 तासांचीही प्रतीक्षा का केली नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर केला गेला नाही, असा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. आज घर पाडले गेले असले तरी पुन्हा ते उभे राहील, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना इम्तियाज जलील यांनी एमआयएमला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. पोलिस, सत्ता आणि प्रशासन त्यांच्या हातात आहे. आम्ही न्यायालयात जातो, पण न्यायालयाच्या निर्णयालाही किंमत दिली जात नसेल तर आम्ही न्याय कुठे मागायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मतीन हा माझा विश्वासू माणूस मतीन पटेल यांच्याविषयी बोलताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मतीन हा माझा विश्वासू माणूस आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल तर त्याची अंमलबजावणीही समान पद्धतीने झाली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणामुळे संभाजीनगरातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *