व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू मनोहर भोसले याची न्यायालयाने 3 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. यामुळे स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या या भोंदूचा पाय खोलात गेल्याचा दावा केला जात आहे
.
सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी एका प्रकरणात सोलापूरच्या कुर्डूवाडी येथून भोंदू मनोहर भोसले व त्याचा सहकारी विशाल वाघमारे या दोघांना अटक केली. त्यानंतर आज त्यांना माढा दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्यावतीने वकील सुभाष हल्याळकर यांनी युक्तिवाद केला. तर सरकारी पक्षातर्फे प्रदिपसिंह राजपूत यांनी बाजू मांडली. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत बचाव पक्षाने आपल्या अशिलांची अटक बेकायदा असल्याचा दावा केला. गुन्ह्यातील कलमे पाहता पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन अटक करण्याची गरज होती, पण पोलिसांनी तसे न करता त्यांना थेट अटक केली, याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला.
त्यांच्या या युक्तिवादावर सरकारी वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. मनोहर भोसले हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पुढील तपासासाठी त्याची पोलिस कोठडी हवी आहे, असे ते म्हणाले. अखेर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मनोहर भोसले व विशाल वाघमारे या दोघांना प्रत्येकी 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
भोंदू भोसलेचे फडणवीस, गडकरी, पटोलेंसोबत फोटो

दुसरीकडे, भोंदू मनोहर भोसलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. तो या फोटोत एका सोफ्यावर बसून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना दिसून येत आहे. हा फोटो केव्हाचा आहे व कुठला आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या फोटोची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे. मनोहर भोसलेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतचाही एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत गडकरी भोसलेला हात जोडताना दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही दिसून येत आहेत. भोसलेच्या या फोटोचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मनोहर भोसलेचा काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबतचाही एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत भोसले हा नाना पटोलेंचा नारळ देऊन सत्कार करताना दिसून येत आहे. हा फोटोही केव्हाचा आहे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या तिन्ही फोटोंमुळे भोंदू मनोहर भोसलेची राजकारण्यांसोबत असणारी उठबस अधोरेखित झाली आहे.

हे ही वाचा…
भोंदू मनोहर भोसलेला पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या?:स्वतःला बाळूमामाचा अवतार समजत होता; फिर्यादीने तक्रारीत काय म्हटले?

सोलापूर पोलिसांनी स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या भोंदू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांत तो जामिनावर असताना आता पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फिर्यादीने त्याची या भोंदूने कशी फसवणूक केली? याची विस्तृत माहिती पोलिसांना दिली आहे. त्यात त्याने आरोपीला काळ्या जादूची अघोरी विद्या प्राप्त असल्याचाही दावा केला आहे. वाचा सविस्तर