.

श्री क्षेत्र कौंडण्यपूर नगरीत आयोजित ‘महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानीचा’ या संकल्पनेतील अंबा रुख्मिणी महोत्सव-२०२६ चा समारोप अत्यंत भक्तिमय आणि ऐतिहासिक वातावरणात झाला. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी (दि. २३) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरदायिनी मातेला २२१ मीटर अखंड साडी अर्पण करण्यात आली. सुरत येथून तयार करून आणलेली ही २२१ मीटर लांबीची साडी बोटिंगच्या साहाय्याने वरदायिनी मातेला (वर्धा नदीला) अर्पण करण्यात आली. रविराज देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि अॅड. योगेश देशमुख यांच्या विशेष सहकार्यातून साकारलेल्या या २२१ मीटर अखंड साडी अर्पण सोहळ्याने कौडण्यपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. त्यानंतर २२१ मीटर अखंड साडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी जगद्गुरू राजराजेश्वर माऊली सरकार, बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत जितेंद्रनाथ महाराज, अंबिका देवस्थानचे पुजारी नरेंद्र पुरी महाराज, आचार्य सागर महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. तसेच माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण तायडे, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सरपंच प्रेमदास राठोड, महाराष्ट्र देवस्थान समितीचे विश्वस्त आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
साडी पूजनानंतर उपस्थित मान्यवर आणि भाविकांच्या साक्षीने बोटिंगच्या साहाय्याने २२१ मीटर अखंड साडी वरदायिनी मातेला अर्पण करण्यात आली. या अनोख्या सोहळ्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. साडी अर्पणाचा हा क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी कौडण्यपूरच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेल्या महत्त्वावर भाष्य केले. कौडण्यपूर कॉरिडॉर तसेच येथील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी आगामी अधिवेशनात विशेष बैठक घेण्यात येईल. कौडण्यपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सकारात्मक असून लवकरच कौडण्यपूर कॉरिडॉरचे काम मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेमुळे कौडण्यपूरच्या विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सचिव अक्षय पुंडेकर यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी २१, २२ आणि २३ नोव्हेंबर या तीन दिवसांत आयोजित अंबा रुख्मिणी महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. एक लाख दिव्यांचा भव्य दीपोत्सव, वरदायिनी आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नामवंत कलाकारांची उपस्थिती आणि २२१ मीटर अखंड साडी अर्पण सोहळा अशा विविध उपक्रमांनी महोत्सवाची रंगत वाढवली. विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासोबतच कौडण्यपूरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या महोत्सवाने केले.