![]()
कडक उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी थंड पाणी ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाला यंदा महागाईची झळ बसली आहे. कच्चा माल आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे माठ तयार करणे कुंभार व्यावसायिकांना कठीण झाले असून, किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आधुनिक युगात घराघरांत फ्रीज पोहोचले असले, तरी आरोग्यासाठी हितकारक असलेल्या माठातील पाण्याची ओढ आजही कायम असल्याने बाजारात मागणी वाढू लागली आहे. मंगळवेढा शहरातील कुंभार गल्लीतील कारागीर आजही या पारंपारिक व्यवसायात गुंतलेले आहेत. मात्र, माठ तयार करण्यासाठी लागणारी कर्लाची माती, मरोळची माती, राख आणि लीद यांसारख्या साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. नदीकाठी मिळणारी माती आता विकत घ्यावी लागते, तर उन्हाळ्यात माती भिजवण्यासाठी लागणारे पाणीही विकत घेण्याची वेळ कुंभार समाजावर आली आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक व्यावसायिक स्वतः उत्पादन करण्याऐवजी मरवडे, ढवळस, तावशी, गुंजेगाव, अनगर यांसारख्या ठिकाणाहून तयार माल आणून विकण्यावर भर देत आहेत. कुंभार व्यवसायावर पूर्वी शासनाचे निर्बंध कमी होते. मात्र, आता प्रदूषण महामंडळाने कडक नियमावली लागू केली आहे. शहरामध्ये मातीची भांडी भाजताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे नागरी वस्तीत अडथळे येतात, परिणामी या व्यवसायाला शासनाकडून परवानगी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे हा पारंपारिक व्यवसाय लोप पावतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. आधुनिक फ्रीजमधील पाणी प्यायल्याने सर्दी, डोकेदुखी यांसारखे त्रास उद्भवतात. याउलट मातीच्या माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड होत असल्याने ते शरीरास अपायकारक ठरत नाही. सध्या ज्वारी कापणीचे (सुगीचे) दिवस असल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी माठातील पाणीच संजीवनी ठरत आहे. काय आहेत माठाचे (डेऱ्याचे) दर माठाचा प्रकार -किंमत सर्वात लहान माठ – १७५ एक घागर डेरा – २५० दीड घागर डेरा – ३२५ सर्वात मोठा माठ- ५०० फ्रीजच्या पाण्याने तहान भागत नाही पूर्वीपासून माठातील पाणी पिण्याची सवय आहे. फ्रीजमधील पाण्याने तहान भागत नाही. शेतात काम करताना माठ सहज उपलब्ध होतो. किमती वाढल्या असल्या तरी आरोग्यासाठी गरज असल्याने आम्ही माठ खरेदी केला आहे. -प्रतापसिंह राजपूत, ग्राहक, मंगळवेढा सध्या माठांना मागणी चांगली आहे आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. मात्र, आता काळी माती ५ हजार रुपये टिप्पर, घोड्याची लीद २०० रुपये पोते आणि जळण-लाकूडही महागले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने किमती २५ टक्क्यांनी वाढवाव्या लागल्या आहेत. – अमर कुंभार , विक्रेते, कुंभार गल्ली, मंगळवेढा
Source link
उत्पादन खर्चात वाढल्याने माठांच्या किमतीत 25% वाढ, मंगळवेढ्यात मातीच्या माठांची मागणी वाढली