Headlines

उद्धव ठाकरेंना हटवून संजय राऊतच पक्ष ताब्यात घेणार:नवनाथ बन यांचा पलटवार, म्हणाले- सतेज पाटलांनी एका सुनावणीसाठी 1.80 कोटी उधळले




गोकुळ दूध संघाच्या खटल्यात सरकारी वकिलांना 80 लाख रुपये फी दिल्यावरून आक्षेप घेणारे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पुराव्यांसह गंभीर पलटवार केला आहे. “9 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीसाठी सतेज पाटील यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना दिल्लीतून विशेष चार्टर्ड फ्लाईटने बोलावले. चार्टर्ड फ्लाईटचे 1 कोटी रुपये आणि सिंघवींची फी 80 लाख रुपये असे तब्बल 1 कोटी 80 लाख रुपये एका दिवसात उधळले गेले; हा पैसा नेमका कोठून आला, याचा हिशेब सतेज पाटलांनी आधी महाराष्ट्राला द्यावा,” असे थेट आव्हान बन यांनी दिले. यासोबतच त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचे अलिबागमधील 10 सातबारा उतारे उघड करत राऊत, उद्धव ठाकरे, रोहित पवार आणि महापालिकेतील एफडी (FD) वादावर चौफेर प्रहार केला. सतेज पाटलांचा 1 कोटी 80 लाखांचा खर्च कोठून? गोकुळ प्रकरणातील वकिलांच्या फीवरून काँग्रेसने केलेल्या टीकेचा समाचार घेताना नवनाथ बन यांनी सतेज पाटील यांना थेट धारेवर धरले. पॅनलवरील सरकारी वकिलांना शासकीय नियमानुसारच 80 लाख रुपये फी दिली जाते. मात्र, सतेज पाटील यांनी 9 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील आपल्या खासगी सुनावणीसाठी अभिषेक मनु सिंघवी यांना दिल्लीहून आणण्या-नेण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटवर 1 कोटी रुपये आणि सिंघवींच्या फीपोटी 80 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 80 लाख रुपये खर्च केले. जर शेतकरी संकटात होते, तर हे 1 कोटी 80 लाख रुपये कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना का दिले नाहीत, असा सवाल बन यांनी विचारला. महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक दुष्काळी मदतीची तुलना महाराष्ट्रातील महायुती सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5000 रुपये अग्रिम मदत आणि कर्जमाफी दिली. याउलट, कोल्हापूरशेजारील कर्नाटकात सतेज पाटील यांच्याच काँग्रेस पक्षाचे सरकार असून तिथे शेतकऱ्यांना अंतिम मदत म्हणून केवळ 2500 रुपये दिले गेले आणि कोणतीही कर्जमाफी दिली नाही. ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ ही काँग्रेसची जुनी सवय सतेज पाटलांना लागली असल्याची टीका त्यांनी केली. किहीम गावात राऊत व पाटकरांचे 10 सातबारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर नवनाथ बन यांनी जमीन व्यवहारांचे गट क्रमांक वाचून दाखवत गंभीर आरोप केले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम गावात वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकर यांच्या नावावर तब्बल 10 जमीन व्यवहार (सातबारा) असल्याचे बन यांनी सांगितले. यामध्ये सामाईक खाते गट क्रमांक 110/142/1 (क्षेत्र 7.70 आर), 110/42/12, 110/42/13, 110/142/2, 142/4, 142/5, 142/6, 142/7 आणि 142/8 यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना फसवून व धमकावून घेतलेल्या या 10 सातबाऱ्यांवर राऊतांनी आधी पत्रकार परिषद घ्यावी. आदिवासींच्या अपमानावरून राऊतांना आव्हान शिवसेना फुटीबाबत राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल दिला, या द्वेषातून राऊत त्यांना बदनाम करत आहेत. नार्वेकरांनी फसवणूक न केल्याचे व्हिडिओ बाईट स्वतः आदिवासींनी दिले आहेत. राऊतांमध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी उद्या 4 आदिवासी बांधवांना सोबत घेऊन भांडूपच्या गाढव नाक्यावर पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान बन यांनी दिले. मातोश्री आणि भांडूपच्या बंगल्यावरून किती पैसे वाटले? महापालिका निवडणुकीत उबाठा गटाने शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी केली; मात्र जनतेने मेट्रो, कोस्टल रोड आणि बीडीडी चाळीतील हक्काची घरे देणाऱ्या महायुतीला कौल दिला. 100 कोटींच्या वसुलीचा इतिहास असलेल्यांनी भांडूपच्या बंगल्यावरून आणि मातोश्रीवरून किती पैसे वाटले, याचा हिशोब द्यावा. तसेच, राऊतांकडे दररोज 100 कोटी या हिशोबाने 90000 कोटी रुपये असतील, तर खासदारांना 150 काय 200 कोटी रुपयांची बोली लावून किती जण सोबत येतात हे त्यांनी पाहून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. देशात नव्हे, तर उबाठा गटातच एप्रिल-जूनमध्ये ‘रेजीम चेंज’ होणार संजय राऊत यांनी देशात ‘रेजीम चेंज’ (सत्ताबदल) होण्याबाबत केलेल्या विधानाची नवनाथ बन यांनी खिल्ली उडवली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2029 पर्यंत आणि त्यानंतरही एनडीएचेच भक्कम सरकार राहील. मात्र, ‘रेजीम चेंज’ हा उबाठा गटातच होणार आहे. सध्या उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असले तरी प्रतिपक्षप्रमुख असलेले संजय राऊत हे येत्या एप्रिल, मे किंवा जून महिन्यात उद्धव ठाकरेंना हटवून पक्षाची पूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतील, असा दावा बन यांनी केला. इंडिया आघाडीचे अस्तित्वच शिल्लक नाही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडून सोनिया गांधी व राहुल गांधींचे विचार स्वीकारणाऱ्या राऊतांनी उरलेला आपला ‘बचत गट’ काँग्रेसमध्ये कधी विसर्जित करणार, याचा मुहूर्त जाहीर करावा. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत; राऊतांनी त्यांची प्रवक्तेगिरी करू नये. इंडिया आघाडीत अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टी, ममता बॅनर्जी आणि उबाठा गट असे 5 वेगवेगळे सूर असून प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, तर राऊतांना गृहमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. रोहित पवार स्वयंघोषित नेते; काँग्रेसला राहुल गांधींच्या सभेसाठी धमक्या देऊन लोक आणावे लागतात! सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) रोहित पवार यांच्या नागपूर ट्रॅक्टर मोर्चापासून फारकत घेतल्याच्या मुद्द्यावरून बन यांनी रोहित पवार व काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवार हे कधी विद्यार्थ्यांचे, कधी शेतकऱ्यांचे, तर कधी उजनी डेटा सेंटरच्या विरोधात स्वयंघोषित नेते बनून फिरतात. कोणतीही मेहनत न करता केवळ स्टंटबाजी करून राज्याचे नेतृत्व मिळवण्याची त्यांची नौटंकी आता सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षाने ओळखली आहे, म्हणूनच कोणीही त्यांच्या आंदोलनासोबत नाही. अतुल लोंढेंना प्रत्युत्तर रोहित पवारांना पाठिंबा जाहीर करणाऱ्या काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना टोला लगावताना बन म्हणाले की, “तुमच्या राहुल गांधींच्या आंदोलनाला लोक येत नाहीत म्हणून पद काढून घेण्याच्या धमक्या देऊन बळजबरीने गर्दी जमवावी लागते. आधी राहुल गांधींसाठी लोक जमवायला शिका आणि मग रोहित पवारांना पाठिंबा द्या.” महापालिकेच्या एफडी 6 टक्क्यांनी ठेवून 12 टक्क्यांनी कर्ज काढणे हा ‘आतबट्ट्याचा व्यवहार’! मुंबई महापालिकेच्या ठेवी (FD) विकासकामांसाठी वापरण्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बन यांनी 25 वर्षांच्या कारभाराचा पाढा वाचला. बँकांमध्ये 5 ते 6 टक्के व्याजदराने एफडी ठेवायच्या आणि मुंबईतील प्रकल्पांसाठी 10 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज काढायचे, याला ग्रामीण भाषेत ‘आतबट्ट्याचा व्यवहार’ म्हणतात. गेल्या 25 वर्षांत उबाठा गटाने हाच धंदा करून केवळ बँका आणि दलालांचे गल्ले भरले. आता हा पैसा मुंबईकरांच्या सुखसोयींसाठी वापरला जात असेल, तर विरोधकांच्या पोटात का दुखते? काँग्रेसला 25 वर्षांच्या कारभारावर श्वेतपत्रिका हवी असेल तर आमची तयारी आहे, पण त्यासाठी उबाठा गटाची संमती आहे का, हे काँग्रेसने आधी विचारावे, असे बन म्हणाले. दरम्यान, कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावर बोलताना बन म्हणाले की, राजू शेट्टींनी ‘रक्ताचे पाट’ वाहण्याची भाषा करू नये आणि 5000 पोलीस तैनात असल्याचा खोटा दावा करू नये. समृद्धी महामार्गाला उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये विरोध केला होता, तरीही तिथेच सर्वात वेगाने भूसंपादन झाले. देवेंद्र फडणवीसांनी 18 पगड जातींना सोबत घेतल्यानेच महायुतीचे 137 आमदार निवडून आले आहेत; राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांसोबत बसून शक्तिपीठ महामार्गाचे फायदे समजून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, 4 वर्षांपूर्वी सुरतच्या घटनेत आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचे औषध दिल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांच्या विधानावर खुद्द नितीन देशमुख यांनीच खुलासा करावा, असेही बन यांनी नमूद केले. ————————————————– हेही वाचा… शरद पवार अजिबात निवृत्त होणार नाहीत!: त्यांच्या राज्यसभेची अजून 5 वर्षे बाकी आहेत; कोणी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवेल; सुप्रिया सुळे कडाडल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’मध्ये (NDA) सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीने निवृत्तीच्या बातम्या येत असतील, तर ते अत्यंत संतापजनक आहे. शरद पवार निवृत्त होणार नाहीत; त्यांच्या राज्यसभेचा अजून 5 वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे, तेव्हा ते निवृत्त कसे होतील? कोणी निवृत्त व्हायचे, हे जनता ठरवणार,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *