![]()
पुणे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी आणि बालकांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियान सुरू झाले. यानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बालविवाहमुक्तीची शपथ घेतली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन यांच्या माध्यमातून हे अभियान राबवले जाणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात जनजागृती रॅली, शपथविधी आणि ग्रामसभा होतील. किशोरवयीन मुला-मुलींसाठी मार्गदर्शन सत्रे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम तसेच बाल संरक्षण समित्यांच्या बैठका घेतल्या जातील. विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, शाळा-महाविद्यालये, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवी संस्था या उपक्रमांत सहभागी होतील. बालविवाह, बालमजुरी, बालकांवरील अत्याचार आणि महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठीच्या कायद्यांची माहिती नागरिकांना दिली जाईल. यात बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा ‘पॉक्सो’ कायदा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा आणि महिला संरक्षणविषयक कायद्यांचा समावेश आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका आणि बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध शासकीय यंत्रणांबाबतही मार्गदर्शन केले जाईल. बाल संगोपन योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती कार्यक्रमांत दिली जाईल. एखादे बालक संकटात असल्यास 1098 या चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधावा. महिलांना मदतीची गरज असल्यास 181 या महिला हेल्पलाइनवर संपर्क करावा, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण अधिकारी मंगेश जाधव यांनी केले. बालविवाह ही सामाजिक समस्या असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबत समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पालक, शिक्षक, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी जनजागृती उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.
Source link
पुणे जिल्ह्यात बालविवाहमुक्ती अभियान सुरू:रॅली, ग्रामसभा आणि मार्गदर्शन सत्रे होणार; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ