![]()
अन्न व औषध प्रशासनाने रविवारी बीड बायपासवरील शहानूरवाडी येथील ‘केएफसी’ उपाहारगृहावर छापा टाकला. किचनमधील अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका असल्याचे उघडकीस आल्याने प्रशासनाने हॉटेलचा अन्न परवाना निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत ओव्हनमधील ग्रील व बेकिंग ट्रे अनेक दिवसांपासून न धुतल्याने काळेकुट्ट होते. चिकन बनवण्याचा ओटा घाणीने माखलेला होता. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे विलगीकरण नव्हते. क्रेटमध्ये कच्चे मांस कोंबून ठेवले होते. बेसिनजवळ तुंबलेला कचरा, कोल्ड स्टोरेजजवळ साचलेले पाणी आणि सॉसच्या तेलकट बाटल्या आढळल्या. याशिवाय, तापमान नियंत्रणात हलगर्जी दिसून आली. केएफसी व्यवस्थापनाकडे खाद्यतेलाचा तपासणी अहवाल आढळून आला नाही. तसेच प्रयोगशाळा प्रमाणपत्र आणि कीटक नियंत्रणाच्या नोंदी हॉटेलकडे नव्हत्या. या गंभीर त्रुटींमुळे सहायक आयुक्त द. वि. पाटील यांनी केएफसीचा परवाना तत्काळ निलंबित केला आहे. सर्व त्रुटी दूर करून अनुपालन अहवाल सादर केल्यावर आणि प्रशासनाचा लेखी आदेश मिळेपर्यंत हे हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहे. मानकांचे पालन गरजेचे आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेन्सना शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी केवळ स्वतंत्र स्वयंपाकघरच नाही, तर उपकरणांचे ‘कलर कोडिंग’ वापरणे जागतिक अन्न सुरक्षा मानकांनुसार बंधनकारक असते. यात हलगर्जीपणा हा ‘एफएसएसएआय’ कायद्यानुसार परवाना तत्काळ निलंबित करण्याइतका गंभीर गुन्हा मानला जातो.
Source link
एफडीएची कारवाई:संभाजीनगरच्या बीड बायपासवरील‘केएफसी’त घाण; परवाना निलंबित, काळेकुट्ट ट्रे अन् कच्च्या-शिजवलेल्या मांसाची सरमिसळ