![]()
भाजपाचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर मंगळवारी तारीख 24 सकाळी 11 वाजता हिंगोली शहरालगत महाकाली नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भाजपचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांच्यावर दिल्ली येथे एम्स रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे भाजपा सह महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. सोमवारी तारीख 23 त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर मार्गे परभणी येथे आणण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सायंकाळी यांचे पार्थिव हिंगोली येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील एनटीसी भागातून अंत्ययात्रा काढण्यात आली. खासदार रामराव वडकुते अमर रहे अशा घोषणा देत निघालेली अंत्ययात्रा महाकाली नगर येथे आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वडकुते कुटुंबीयांचे राजकीय पुनर्वसन करावे; धनगर समाजाची भाजपकडे मागणी भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राज्याबाहेरही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. धनगर समाजाला भाजपाच्या विचारप्रवाहाशी जोडण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अकाली निधनामुळे भाजपाने एक निष्ठावंत आणि प्रभावी नेतृत्व गमावले असून, धनगर समाजाचीही मोठी राजकीय हानी झाली आहे.त्यामुळे आता पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत वडकुते कुटुंबीयांचे राजकीय पुनर्वसन करावे, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होऊ लागली आहे. खासदार रामराव वडकुते यांच्या पत्नी इंदुबाई वडकुते किंवा त्यांचे पुत्र शशिकांत वडकुते यांना भाजपाने राजकीय संधी द्यावी, अशी भावना समर्थक आणि समाजबांधवांमधून पुढे येत आहे. मुख्यमंत्री-पक्ष निश्चितच योग्य निर्णय घेईल- बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खासदार रामराव वडकुते यांच्या कुटुंबीयांची पुनर्वसन करण्याच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्ष निश्चितच योग्य निर्णय घेईलच. तसेच वडकुते यांचे समाजाची राज्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लावले जातील.
Source link
खासदार रामराव वडकुते अनंतात विलीन:हिंगोलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, दिग्गज नेत्यांची उपस्थिती