Headlines

गांधीभवन येथे 34वे गांधी दर्शन शिबिर:डॉ. कुमार सप्तर्षींच्या कार्याला उजाळा, 40 कार्यकर्त्यांचे रक्तदान




पुण्याच्या कोथरूड येथील गांधीभवन येथे ३४ व्या गांधी दर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवक क्रांती दलाचा रौप्य महोत्सवही या दिवशी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. कुमार सप्तर्षींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, तसेच ४० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरासोबतच चित्रपट प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन आणि युवक क्रांती दलाच्या कार्याची तसेच युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या स्मृतींना उजाळा देणारी मनोगते सादर करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘अंकुर’ चित्रपट दाखवण्यात आला. तसेच ज्येष्ठ लेखक शंकर निकम यांनी लिहिलेल्या ‘आशियाचा दीपस्तंभ जवाहरलाल नेहरू’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबीर व चित्रपट प्रदर्शन झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त रमेश आढाव, मच्छिंद्र गोरडे, एम. एस. जाधव, सुनील पाटील उपस्थित होते. विश्वस्त सचिव अन्वर राजन यांच्या अध्यक्षतेखाली मनोगतांचे सत्र पार पडले. यावेळी मधू मोहिते यांनी डॉ. कुमार सप्तर्षींना ‘मुक्त विद्यापीठ’ असे संबोधले. ते म्हणाले की, युवक क्रांती दल म्हटले की डॉ. कुमार सप्तर्षी हे नाव डोळ्यासमोर येते. दलित जाती या क्रांतीच्या दूत आहेत, अशी भूमिका डॉ. सप्तर्षी यांनी मांडली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची वैचारिक पाठशाळा झाली, जिथे त्यांना बोलके केले गेले. सुशीला मोराळे यांनी मराठवाड्यावरील अन्यायावर प्रकाश टाकत, डॉ. कुमार सप्तर्षी, राम बापट, वसुधा सरदार, गोविंद केंद्रे, भालचंद्र मुणगेकर यांसारख्या विचारवंतांसोबतच्या चर्चांनी आपल्याला घडवल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, युक्रांदमधील विचारांनी मला आंदोलनात उतरण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे २२ दिवसांचा तुरुंगवासही घडला. डॉ. कुमार सप्तर्षींकडे लोकांना मोहिनी घालण्याची जादू होती, ज्यामुळे अनेक आंतरजातीय विवाह यशस्वी झाले. मधू मोहिते, सुशीला मोराळे यांच्यासह अंजली सोमण, अंजली कुलकर्णी, विकास लवांडे, अॅड. गोपाळ गुणाले, सुदर्शन चकाले, सचिन पांडुळे, कॉम्रेड किशोर ढमाले, विमल पाटील आदींनीही डॉ. कुमार सप्तर्षी व युक्रांदमधील आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *