![]()
श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात कार्तिक मासानिमित्त विविध धार्मिक उत्सव, पूजाविधीने आध्यात्मिक सोहळ्यांची सांगता झाली. आश्विन पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा या कालावधीत पवित्र कार्तिक स्नानाच्या उद्देशाने रोज पहाटे काकड आरती सोहळ्याचे आयोजन क
.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भूपाळ्या, गाणी, श्लोक आणि स्तुतिपाठाच्या माध्यमातून ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा…’ अशी आळवणी करत भगवंताला उठविण्यात येत होते. त्यानंतर दूध, लोणी, साखरसाय, अत्तर, गुलाबदाणी आणि विविध अलंकार अर्पण करून पुष्पहार, तुळस, कुंकू, बुक्का व नैवेद्यासह भगवंताची मानसपूजा केली जात असे. या काकडा आरती, स्तोत्रपठण आणि भक्तिगीतांमुळे संपूर्ण कार्तिक महिन्यात मंदिर परिसरात चैतन्यपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दहीहंडी आणि महाप्रसादाच्या वाटपाने या महिनाभर चाललेल्या धार्मिक महोत्सवाची सांगता झाली. मंदिराची पारंपरिक धार्मिक संस्कृती, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वारसा जतन करणाऱ्या या सर्व उत्सवांमध्ये चांदवड परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्तिक महिन्यात निर्माण झालेले हे भक्तिमय वातावरण भाविकांसाठी श्रद्धा, समाधान आणि आनंदाची अभूतपूर्व पर्वणी ठरले. कार्यक्रमासाठी मंदिराचे पुजारी अमोल दीक्षित, अरुण दीक्षित, किशोर दीक्षित, भूषण दीक्षित, कृष्णा दीक्षित, अर्चित दीक्षित व संपूर्ण दीक्षित परिवाराने परिश्रम घेतले.
५६ भोगांचा अन्नकूट नैवेद्य आणि गोपूजन कार्तिक महिन्यात श्री अन्नकूट महोत्सव व गोवर्धनपूजन भक्तिभावाने साजरे करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केल्याच्या पौराणिक प्रसंगाचे स्मरण करत ५६ भोगांचा अन्नकूट नैवेद्य अर्पण करण्यात आला. या पूजनातून निसर्ग, पर्यावरण आणि अन्नदाता यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गोमातेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे गोपूजनही याप्रसंगी करण्यात आले.
कार्तिकी एकादशीच्या पर्वावर गोपाळकृष्णाचा विशेष अभिषेक व पूजन करण्यात आले. मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी अमोल दीक्षित गुरुजी यांनी श्री गोवर्धन गिरिधारी गोपाळकृष्णास विठ्ठलाचे विलोभनीय रूप दिले होते. या विशेष श्रृंगारपूजन आणि हरिनाम संकीर्तनामुळे वातावरण भक्तिरसात रंगून गेले होते.