![]()
नामपूर–सटाणा रस्त्यावरील खिरमाणी फाट्याजवळ काटेरी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पसरल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर आलेल्या या फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे
.
या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झाडे रस्त्यावर पसरल्याने वाहनांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात काटेरी फांद्या वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वारांना या फांद्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने अथवा जबाबदार यंत्रणेने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्यावर आलेल्या काटेरी झाडांच्या फांद्या हटवाव्यात. तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांची नियमित साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष न करता कार्यवाही करावी. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.