सध्या सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. मिरवणुकांमुळे रस्ते अडवले जातात. उत्सव आला की नागरिकांच्या मनात धडकी भरते. उत्सवखोर प्रबोधन ऐकत नसल्याने सार्वजनिक ठिकाणचे ध्वनिप्रदूषण केवळ कठोर कायदेशीर कारवाईनेच थांबू शकते.
.
“दिव्य मराठी”च्या कार्यालयात भेट दिली असता, त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरी हक्क, सार्वजनिक रस्त्यांचा वापर, सण-उत्सवांचे अर्थकारण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर सडेतोड मते मांडली.
अर्जुनाने जसे शिखंडीला पुढे करून भीष्मांवर शरसंधान केले, तसेच हे लोक धर्मस्वातंत्र्याचा शिखंडी पुढे करून मूळ प्रश्नाला बगल देतात

अशी भूमिका मांडताना हल्ल्याची भीती वाटली का?
उत्तर – अजिबात नाही. तो कार्यक्रम महापालिकेच्या सभागृहात होता. मंदिरात असता तर कदाचित विचार केला असता. माझा फोकस पूर्णपणे नागरी हितावर होता. यापूर्वीही मी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत यासंदर्भात निवेदने दिली आहेत.
नास्तिक असल्यामुळे तुम्ही हा विषय अधिक प्रकर्षाने मांडता का?
उत्तर : होय. ध्वनिप्रदूषणावर बोलले की उत्सवखोर आक्रमक होतात. अर्जुनाने जसे शिखंडीला पुढे करून भीष्मांवर शरसंधान केले, तसेच हे लोक धर्मस्वातंत्र्याचा शिखंडी पुढे करून मूळ प्रश्नाला बगल देतात.
तुमच्या मते ‘नास्तिकता’ म्हणजे नेमके काय?
उत्तर: संपूर्ण विश्वावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे तिची प्रार्थना करण्याचीही गरज नाही. हीच माझी साधी व्याख्या आहे.
सकाळी पाच वाजता वाजणाऱ्या भोंग्यांवर तुमची भूमिका काय?
माझा त्याला तत्त्वतः विरोध आहेच. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर समान कारवाई झाली पाहिजे.
गेल्या तीन महिन्यांत काय बदल झाला?
उत्तर : मला ‘बिग बॉस’ आणि एका नाचगाण्याच्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून हास्यास्पद निमंत्रणेही आली. मी नकार दिला. मी फक्त प्रगल्भ श्रोते असलेल्या ठिकाणीच जातो. मात्र आता सामान्य नागरिक बोटचेपी भूमिका सोडून आपल्या हक्कांसाठी उघडपणे बोलू लागले आहेत.
तुमच्या भूमिकेमुळे लोकांच्या भावना दुखावतात, यावर काय सांगाल?
उत्तर – भावना दुखावणे हे मी माझे आद्यकर्तव्य मानतो. शरीरात ‘भावना’ नावाचा कोणताही अवयव नसतो. त्यापेक्षा नागरिकांचे कान, डोके, छाती यांसारखे खरे अवयव आहेत. ज्यांवर डॉक्टर उपचार करतात.त्यांना इजा होऊ नये याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
उत्सवातील त्रास थांबवण्यासाठी नेमका उपाय काय?
उत्तर – आंदोलनांसाठी जसे मुंबईत आझाद मैदान किंवा दिल्लीत जंतरमंतर आहे, तशी स्वतंत्र जागा मिरवणुकांसाठी द्यावी.
उत्सवांचे स्वरूप बदलल्यास त्यावर अवलंबून असलेल्या अर्थकारणाचे काय?
काळानुसार व्यवसाय बदलतात. पूर्वी कॉइन बॉक्स आणि सायबर कॅफे होते. मोबाइल आल्यानंतर ते बंद झालेच ना? त्यामुळे अर्थकारणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
रामायण, महाभारत आणि विवाह संस्थेकडे तुम्ही कसे पाहता?
रामायण आणि महाभारत ही उत्तम काव्ये आहेत. ती काल्पनिक लोककथाच आहेत. तसेच माझा विवाह संस्थेवरही विश्वास नाही.