Headlines

जितेंद्र शेळकेंचा अपघात झाला तिथे काय घडले?:पत्नी अर्धा तास ओरडत होती, मुलगाही अडकला होता, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार




भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा यांचा आज समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला. या घटनेविषयी वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता एका प्रत्यक्षदर्शीने शेळके यांच्या पत्नी अपघातानंतर जवळपास अर्धा तास मदतीसाठी ओरडत असल्याची माहिती दिली आहे. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी व हा अपघात जिथे घडला त्या धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी 12.30 च्या सुमारास घडला. समृद्धी महामार्गावरील किलोमीटर 506.6 जवळ ही घटना घडली. त्यात एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर मी व काही ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचलो. कारमध्ये एक महिला, एक पुरुष व एक 10-12 वर्षांचा मुलगा होता. मुलाला तातडीने कारबाहेर काढून त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्याने आपले नाव सांगत आपण जितेंद्र शेळके यांचा मुलगा असल्याचे सांगितले. कदाचित कारमधील महिला वाचली असती प्रदीप चव्हाण यांनी यावेळी सदर अपघातानंतर मदत मिळण्यास बराच विलंब झाल्याचेही यावेळी सांगितले. ते म्हणाले, अपघात साडेबाराला झाला. पण क्रेन 2.15 ला पोहोचले. म्हणजेच तब्बल पावे 2 तास उशीर झाला. क्रेन व मदत अर्ध्या-पाऊण तासात मिळाली असती, तर कदाचित कारमध्ये अडकलेल्या महिलेला वाचवता आले असते. मृत महिला अनुराधा शेळके या कारमध्ये समोरच्या सिटवर बसल्या होत्या. त्यांचा केवळ पाय आम्हाला दिसत होता. त्यावेळी त्या बचावासाठी ओरडत होत्या. आम्हाला त्यांना बाहेर काढता आले नाही. पण त्यांच्या मुलाला मोठ्या प्रयत्नांनतर बाहेर काढता आले. त्याचा हात तुटला होता. कोण होते डॉक्टर जितेंद्र शेळके? डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके हे शिर्डी परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. ते केवळ उद्योजकच नव्हते, तर सिल्व्हर ओक डेव्हलपर्स नावाने त्यांनी रिअल इस्टेटचा एक मोठा व्यवसाय उभारला होता. त्यांची स्वतःची एक शैक्षणिक संस्थाही होती. त्या माध्यमातून त्यांनी शिर्डी व परिसरात आपले एक जाळे विणले होते. त्यांचे व भोंदू अशोक खरात याचे जुने संबंध होते. 2023 मध्ये ते खरातच्या शिवनिक ट्रस्टचे सदस्य बनले. त्यानंतर 2025 मध्ये त्यांची ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. खरातच्या शिर्डीतील भूखंड व्यवहारात शेळके महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांची शिर्डी पोलिसांनी चौकशीही केली होती. भोंदू अशोक खरातची जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्येही भागिदारी होती. त्यामुळे खरातला अटक झाल्यापासून ते कमालीच्या तणावात होते. खरातचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर शेळके व सुभाष गमे यांनी ट्रस्टवरील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे राजीनामे त्यांनी थेट नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *