Headlines

तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष:सातारा परिसरात 3 वर्षांच्या मुलीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, उमानगरमधील घटना; कानाचा तोडला लचका




साताऱ्यातील उमानगरमध्ये मोकाट कुत्र्यांनी शनिवारी (६ जून) घरासमोर खेळणाऱ्या एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला. तिच्या कानाचा लचका तोडला. गंभीर जखमी असलेल्या चिमुकलीवर घाटीत उपचार सुरू आहेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सृष्टी निखिल बाहेती (३, रा. उमानगर) असे चिमुकलीचे नाव आहे. गट नंबर १६० मध्ये असलेल्या उमानगर परिसरातील रहिवासी बाहेती कुटुंबातील ही चिमुकली नेहमीप्रमाणे घरासमोर खेळत होती. वॉटर बॉटलमधील पाणी संपल्याने ती घरी पाणी घेण्यासाठी जात होती. त्याचवेळी एका मोकाट कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली. या हल्ल्यात कुत्र्याने चिमुकलीच्या कानाचा लचका तोडला, ज्यामुळे कानाजवळ गंभीर दुखापत झाली आहे. कुत्र्याने चिमुकलीच्या डोक्याला, मानेला आणि पाठीलाही क्रूरपणे चावा घेतला. चिमुकलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर आई-वडिलांनी तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले. सृष्टीवर सध्या घाटीत उपचार सुरू आहेत. शहरात ५० हजार मोकाट कुत्र्यांचा वावर शहरात ५० हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्रे असूनही महापालिकेकडे यावर कोणतीही ठोस उपाययोजना नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणासाठी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी सरासरी १००० ते १२०० रुपये खर्च करते. यासाठी निविदा काढल्या जातात, कुत्रे पकडण्याची संथ गती, निर्बीजीकरण केंद्रांची दुरवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा खर्च पाण्यात जात आहे. परिणामी, सातारा परिसरासारख्या घटना वारंवार घडत असून चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात लहान मुलांचे घराबाहेर पडणे झाले बंद या घटनेमुळे बाहेती कुटुंबासह संपूर्ण सातारा परिसरात तीव्र संतापाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्र्यांच्या भीतीपोटी गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील पालकांनी आपल्या लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवणे पूर्णपणे बंद केले आहे. उमानगरमधील गल्ल्यांमध्ये आता शुकशुकाट पसरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *