Headlines

दुष्काळाच्या झळा, विजेचा लपंडाव; अकोल्याचे प्रश्न मंत्रालयात मांडले:आमदार लहामटें यांची ‎उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार‎यांच्याशी भेट‎




अकोले विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मंगळवारी (२२ सप्टेंबर) मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील विविध प्रश्नांचे निवेदन सादर करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. अकोले तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने पिके करपून सुकली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून अहिल्यानगर जिल्ह्यासह अकोले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी आग्रही मागणी लहामटे यांनी केली. तालुक्यात शेती व गावठाण फीडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शासनाकडून आठ तास वीज दिली जात असली तरी दर अर्ध्या तासाने वीज खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यात अडथळे येत आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा असूनही विजेअभावी पिके सुकत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने सायंकाळी ६ ते रात्री ९ या अभ्यासाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आदिवासी बांधवांच्या अडचणी आणि पेसा भरतीचा प्रश्नही त्यांनी मांडला. पेसा भरतीसाठी अकोले तालुक्यात आदिवासी तरुणांचे उपोषण सुरू असून पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी लहामटे यांनी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध मागण्यांची दखल घेत प्रशासकीय यंत्रणेला योग्य कार्यवाहीच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *