![]()
राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विलिनीकरणाच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत यापूर्वीच निर्णय झाला होता. 18 जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक झाली होती आणि त्या बैठकीला आपण स्वतः उपस्थित होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या विषयावर यापूर्वी चर्चा झाली होती. या बैठकीत अजित पवार यांचीही दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका होती. त्यामुळे त्यावेळी एकत्र येण्याबाबत ठरले होते, ही वस्तुस्थिती आहे. या विषयावर सध्या अनेक नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत काय चर्चा झाली आणि त्यावेळी कोणती भूमिका मांडण्यात आली, याची आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मागील निवडणुका दोन्ही गटांनी एकत्रितपणे लढवल्याचेही त्यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय परिस्थिती बदलल्याचे सांगताना पाटील यांनी भावनिक प्रतिक्रियाही दिली. अजितदादांच्या अपघाती निधनाने मोठे दुःख झाले. आजही प्रत्येक टप्प्यावर त्यांची आठवण येते. मात्र, त्यांच्या निधनानंतर राजकीय परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे विलिनीकरणाच्या विषयावर पुढे काय निर्णय होणार, हे आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. 18 जानेवारीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं होतं? विलिनीकरणाच्या चर्चेतील 18 जानेवारीच्या बैठकीचा उल्लेख करत हर्षवर्धन पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. या बैठकीला अजित पवार स्वतः आले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. या प्रक्रियेत आपणही सहभागी होतो. त्यानंतर पवार साहेबांसोबत बारामतीला जाऊन पुढील निर्णयासंदर्भात चर्चा झाली होती. त्यामुळे विलिनीकरणाचा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित नव्हता, तर त्यावर प्रत्यक्ष पातळीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होती, असे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत विलिनीकरणाबाबत आपल्याशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य आहोत. मधल्या काळात शरद पवार रुग्णालयात असल्याने पक्षातील नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आता पुढे पक्षाकडून बैठक बोलावली गेल्यास त्यामध्ये सहभागी होऊन भूमिका समजून घेऊ, असे पाटील यांनी सांगितले. विलिनीकरणाचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्षांचाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेवरही भाष्य केले. आम्ही पक्षातील ज्येष्ठ नेते असलो, तरी विलिनीकरणासारखा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या अध्यक्षांकडे असतो. कोणत्याही पक्षात वैयक्तिक मतापेक्षा सामूहिक मताला अधिक महत्त्व असते. पक्ष हा एकट्या व्यक्तीच्या मतावर नव्हे, तर सर्वांच्या एकत्रित भूमिकेवर चालत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षातील वरिष्ठ नेते, कोअर कमिटी आणि आमदार यांच्याशी चर्चा करूनच अशा महत्त्वाच्या विषयांवर अंतिम निर्णय घेतला जातो. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची भूमिका आणि त्यानंतर होणाऱ्या बैठका महत्त्वाच्या ठरणार आहेत. सध्या या विषयावर आपल्याशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याने पुढील निर्णयाबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या बैठकीत पक्षातील नेत्यांची भूमिका समजून घेतली जाईल. कोणत्या नेत्यांच्या भेटी झाल्या, कोणाशी चर्चा झाली आणि त्यातून काय निष्पन्न झाले, याची माहिती बैठकीत मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्षांचे प्रमुख, त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कोअर कमिटी आणि पुढे आमदारांशी चर्चा, अशा टप्प्यांमधून विलिनीकरणाची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. मात्र, अद्याप या संदर्भात आपल्यापर्यंत कोणताही प्रस्ताव किंवा अधिकृत चर्चा आलेली नाही, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनीही अलीकडेच प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर हा विषय आपल्यासाठी संपल्याचे त्यांनी म्हटले होते. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे विधान केल्याने या चर्चेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी 18 जानेवारीच्या बैठकीचा संदर्भ देत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत ठरले होते, असा केलेला दावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या संभाव्य कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयावर काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल:ओमराजेंचं मोठं विधान, भरत गोगावलेंनीही दिले एकत्रीकरणाचे संकेत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेच्या दोन गटांच्या एकत्रीकरणाचा विषयही चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नेत्यांकडूनही यासंदर्भात वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सूचक विधानानंतर या चर्चेला अधिक हवा मिळाली आहे. त्यातच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद आपल्यालाच होईल, असे स्पष्टपणे म्हटले आहे. तर मंत्री भरत गोगावले यांनीही राजकारणात कधीही काहीही घडू शकते, असे सांगत या चर्चेवर भाष्य केले आहे. सविस्तर वाचा…..
Source link
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत 18 जानेवारीला बैठक झाली होती:एकत्र येण्याचं ठरलं होतं, हर्षवर्धन पाटलांनी सांगितला बैठकीतील घटनाक्रम