Headlines

फ्युएल 25 तरुणींच्या एमबीए शिक्षणासाठी 50 लाख उभारणार:एनएसईच्या सोशल स्टॉक एक्स्चेंजवर संस्थेची दुसऱ्यांदा नोंदणी; दोन वर्षांचा खर्च उचलणार




पुण्यातील ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज’ (फ्युएल) संस्थेने राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील २५ तरुणींच्या दोन वर्षांच्या एमबीए शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी ५० लाख रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी संस्थेने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) सोशल स्टॉक एक्स्चेंजवर (एसएसई) दुसऱ्यांदा नोंदणी केली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील तरुणींना उच्च शिक्षणाची संधी देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. निवडलेल्या विद्यार्थिनींपैकी सुमारे ६० टक्के तरुणी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतून पुण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी कुटुंबांतील, तर ७३ टक्के कुटुंबातील पहिल्या पिढीतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. दुष्काळ, आर्थिक अडचणी आणि रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरांकडे जातात. आर्थिक आणि नैसर्गिक संकटांमुळे या तरुणींचे शिक्षण अर्धवट राहू नये, हा उपक्रमाचा हेतू आहे. दुसऱ्या सोशल स्टॉक एक्स्चेंज इश्यूचे सबस्क्रिप्शन सुरू झाले असून, ते २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत खुले राहील. नागरिक आणि सामाजिक गुंतवणूकदार झिरोधा ॲपच्या माध्यमातूनही निधी देऊ शकतात. ३० नोव्हेंबरला मुंबईतील एनएसईमध्ये या उपक्रमाचा लिस्टिंग सोहळा होणार आहे. **दोन हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण** उच्च शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी देण्यावरही संस्थेने भर दिला आहे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सच्या (जीसीसी) गरजांनुसार दोन हजार तरुणांना अल्पकालीन डिजिटल आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी संस्थेने पहिल्या सोशल स्टॉक एक्स्चेंज इश्यूद्वारे ९८.२९ लाख रुपये उभारले होते. या निधीतून ४० तरुणींच्या पदवी शिक्षणाचा खर्च उचलण्यात आला. परिस्थिती नव्हे, प्रतिभेला प्राधान्य “परिस्थिती नव्हे, तर प्रतिभा हीच तरुणांच्या भविष्याचा निर्णायक घटक ठरावी, हे आमचे ध्येय आहे. दुसऱ्या सोशल स्टॉक एक्स्चेंज नोंदणीमुळे दुष्काळग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील २५ तरुणींना एमबीएचे शिक्षण पूर्ण करता येईल. प्रत्येक लहान योगदानही एखाद्याच्या आयुष्याची दिशा बदलू शकते,” असे फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्युअरशिप युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष व कुलगुरू डॉ. केतन देशपांडे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *