Headlines

नवरात्रीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे भगदाड?:14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; 3 मंत्र्यांवर ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी




महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदार नवरात्रीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार, असा दावा शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य पक्षप्रवेशाची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 3 मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटाची साथ धरल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता विधानसभा सदस्यांबाबतही असाच दावा पुढे आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत “ठाकरे गटाचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही”, असा दावा केला आहे. त्यामुळे 14 आमदार नेमके कोण? ते खरोखर शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का? आणि या चर्चेमागे नेमकी रणनीती काय आहे? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘ऑपरेशन टायगर – पार्ट 2’ची चर्चा शिंदे गटातील सूत्रांच्या दाव्यानुसार, ठाकरे गटातील 14 आमदारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी विशेष राजकीय मोहीम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन टायगर पार्ट 2’ असे संबोधले जात आहे. या आमदारांशी संपर्क साधण्याची आणि त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी 3 मंत्र्यांवर देण्यात आल्याचा दावा आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या मंत्र्यांमार्फत संबंधित आमदारांशी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दाव्यानुसार, या 14 पैकी काही आमदारांना सत्तेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 6 आमदारांना सरकारमध्ये महत्त्वाची खाती किंवा मंत्रिपद मिळावे, अशी मागणी असल्याची माहिती समोर आली आहे. काही जणांना महामंडळाचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रिपद देण्याबाबतही पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ठाकरे गटाकडे सध्या 20 आमदार 2024च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे 14 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला तर ठाकरे गटाच्या विधिमंडळातील संख्याबळावर मोठा परिणाम होऊ शकतो. ठाकरे गटाच्या सध्याच्या 20 आमदारांमध्ये मेहकरचे सिद्धार्थ खरात, दर्यापूरचे गजानन लवाटे, बाळापूरचे नितीन देशमुख, वणीचे संजय देरकर, परभणीचे राहुल पाटील, विक्रोळीचे सुनील राऊत, जोगेश्वरी पूर्वचे अनंत ऊर्फ बाळा नर, दिंडोशीचे सुनील प्रभू, वर्सोव्याचे हारून खान, कलिनाचे संजय पोतनीस, वांद्रे पूर्वचे वरुण सरदेसाई, माहीमचे महेश सावंत, वरळीचे आदित्य ठाकरे, शिवडीचे अजय चौधरी, भायखळ्याचे मनोज जामसूतकर, खेड-आळंदीचे बाबाजी काळे, उमरग्याचे प्रवीण स्वामी, उस्मानाबादचे कैलास पाटील, बार्शीचे दिलीप सोपल आणि गुहागरचे भास्कर जाधव यांचा समावेश आहे. यापैकी नेमके कोणते 14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, याबाबत मात्र कोणतेही अधिकृत नाव जाहीर झालेले नाही. उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती 14 आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्रीवर दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. विशेषतः आमदारांमध्ये कोणतीही नाराजी किंवा अस्वस्थता आहे का, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या आणि शिंदे गटाच्या संभाव्य राजकीय हालचालींना कसे प्रत्युत्तर द्यायचे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कैलास पाटलांनी दावा फेटाळला दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी 14 आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेला स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. “ऑपरेशन टायगर नेहमी चर्चेत येते. महाराष्ट्रासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. तुमचे बहुमत पूर्ण आहे. आधी तुमच्या आमदारांना न्याय द्या,” असे कैलास पाटील यांनी म्हटले. त्यांनी पुढे सांगितले की, ठाकरे गटाचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चा सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आमचे 14 आमदार फुटणार नाहीत. असं काहीच होणार नाही. आमचा एकही आमदार शिंदेसेनेत जाणार नाही, याची मला खात्री आहे,” असा दावा कैलास पाटील यांनी केला. शेतकरी, बेरोजगारी आणि पेपरफुटीकडे लक्ष द्या या राजकीय चर्चेवरून सरकारवर टीका करताना कैलास पाटील यांनी राज्यातील इतर प्रश्नांचा दाखला दिला. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पिके अडचणीत असल्याचा दावा त्यांनी केला. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे, तसेच परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून विद्यार्थी आंदोलन करत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. राज्य सरकारने आमदार फोडण्याच्या राजकारणापेक्षा शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारी आणि मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. याआधी 6 खासदारांचे पक्षांतर ठाकरे गटाच्या आमदारांबाबतच्या या दाव्यापूर्वी ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळीही याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांची नावे समोर आली होती. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नंतर शिंदे गटाची साथ घेतल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला गेला होता. आता आमदारांबाबतही अशाच प्रकारची चर्चा सुरू झाल्याने ठाकरे गटाच्या पुढील राजकीय रणनीतीकडे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या समीकरणाशीही संबंध? दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आगामी सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवरही शिंदे गटाच्या हालचालींकडे पाहिले जात आहे. मुंबई महापालिकेतील महापौरपदासाठी महायुतीमध्ये सत्तावाटपाचे सूत्र ठरल्याची चर्चा असून, शिंदे गटाला महापौरपदाची संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे एकीकडे मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटातील आमदारांवर लक्ष केंद्रित केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दोन्ही घडामोडींमध्ये थेट संबंध असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. 14 आमदारांच्या चर्चेने ठाकरे गटासमोर नवे आव्हान शिवसेनेतील 2022 च्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष सातत्याने सुरू आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरून सुरू झालेल्या संघर्षानंतर आता दोन्ही गटांकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे गटातील 14 आमदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा खरा ठरला, तर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. दुसरीकडे, ठाकरे गटाने हे आरोप फेटाळून लावल्याने सध्या ही चर्चा केवळ दाव्यांच्या पातळीवर आहे. नवरात्रीपूर्वी या कथित पक्षप्रवेशाबाबत प्रत्यक्षात काय घडते, कोणते आमदार शिंदे गटात जातात किंवा ठाकरे गटातील सर्व आमदार पक्षासोबत कायम राहतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता ‘ऑपरेशन टायगर पार्ट 2’ प्रत्यक्षात येणार की केवळ राजकीय दबावतंत्र ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… 2 कोटी मतदार वगळले, मुंबईत 36 लाख; हा मोठा कट!: संजय राऊतांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा; निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्याची टीका महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकार, निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादीत तब्बल दोन कोटी मतदार वगळल्याचा दावा करताना मुंबईतच 36 लाख मतदार कमी झाल्याचे राऊत यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आर्थिक दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *