![]()
वैजापूर, गंगापूर या तालुक्यांसाठी बांधण्यात आलेल्या मुकणे, भाम, भावली आणि वाकी या धरणांतून नाशिक महापालिका आणि इगतपुरी शहरासाठी पाणी आरक्षित करण्यावर कालवा सल्लागार समितीच्या सोमवारी (२ नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत बंब, रमेश बोरनारे यांनी आक्षेप घेतला. हे आक्षेप मान्य करून हे पाणी कमी करण्याचा ठराव जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात २ आणि उन्हाळी हंगामात १ अशी ३ आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत देण्याचे ठरले. सुरुवातीला हे केवळ १ टीएमसी देण्याचेच ठरले होते. मात्र प्रशांत बंब यांच्या आक्षेपानंतर आणि इतर लोकप्रतिनिधींच्या आक्षेपानंतर हे १.५ टीएमसी करण्यात आले. दुसरे आवर्तन १९ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२७ या कालावधीत १.३५५ टीएमसी पाण्याचे प्रस्तावित आहे. उन्हाळी हंगामासाठी २० एप्रिल ते १ मे २०२७ या कालावधीत एक आवर्तन प्रस्तावित करण्यात आले आहे. या बैठकीस खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, रमेश बोरनारे, विठ्ठलराव लंघे पाटील, प्रतापसिंह पाटील, अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदारांच्या आक्षेपानंतर निर्णय नाशिक मनपाने ०.९८ टीएमसी पाणी आरक्षण टाकले होते. त्यावर आमदार बंब आणि आमदार रमेश बोरनारे यांनी नाशिक, इगतपुरीचे आरक्षण कसे टाकले, असा आक्षेप घेतला. त्यावर सल्लागार समितीच्या बैठकीत पहिले आवर्तन १.५ अब्ज घनफूट करण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केला. या बैठकीसाठी वैजापूरचे शेतकरी व उपोषणार्थी पंडित शिंदे हे रुग्णवाहिकेतून बैठकीस आले होते. ४४ हजार हेक्टर शेतजमिनीला फायदा जिल्हा तालुका गावे सिंचन क्षेत्र
अहिल्यानगर कोपरगाव ०७ १५६२
संभाजीनगर वैजापूर ४९ २५८९४
संभाजीनगर गंगापूर ४६ १६४०४
एकूण १०२ ४३८६० गंगापूर, वैजापूरच्या धरणात नाशिकसाठी आरक्षण कसे? गंगापूर, वैजापूरसाठीच्या धरणांत नाशिक, इगतपुरीला पाण्याचे आरक्षण कसे टाकले? यंदा खरिपाचे मोठे नुकसान झाल्याने नांदूर-मधमेश्वर कालव्यातून गंगापूर, वैजापूरसाठी पहिल्या आवर्तनात १ एेवजी २ टीएमसी दिले पाहिजे. – प्रशांत बंब, आमदार, गंगापूर आधी बिअर कारखाने, उसाचे
पाणी नियंत्रित करावे जायकवाडीतील बिअर कारखान्यांना होणारा पाणीपुरवठा आणि फ्लड पद्धतीने उसाला दिले जाणारे पाणी यावर नियंत्रण ठेवा. मराठवाड्यात या मागणीसाठी पुन्हा आंदोलन केल्यास नाशिककरांनाही आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. – देवयानी फरांदे, आमदार, नाशिक जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ही चारही धरणे केवळ दुष्काळी वैजापूर, गंगापूरसाठी बांधली आहेत. दुष्काळी भागासाठी पाणी असलेल्या भागातून पाणी दिले पाहिजे हा २० जुलै २०१९च्या शासन निर्णय आहे. मात्र तरीही नाशिकच्या केवळ आणि केवळ राजकीय दबावापोटी शासन निर्णयाला हरताळ फासला जातो. गंगापूर-वैजापूरसाठी बांधलेल्या धरणाचे पाणी शहापूर, इगतपुरीला दिले जाते. त्यामुळे दुष्काळी भागाला फटका बसतो. – शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ
Source link
‘नांदूर-मधमेश्वर’मधून रब्बीच्या 2, उन्हाळीच्या एका आवर्तनास मान्यता:गंगापूर, वैजापूरच्या पाण्यावरून संभाजीनगर-नाशिक आमनेसामने