![]()
पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. मात्र, नाशिकच्या मालेगावमध्ये याउलट आणि अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या मानसिक छळाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासू आणि सासऱ्यांना अटक केली असून, मृताच्या कुटुंबीयांनी फरार पत्नीला अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. नेमकी घटना काय? मालेगावच्या कॅम्प भागातील साने गुरुजी नगरमधील रहिवासी अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अनिकेतचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती धिवरे हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. हे वाद इतके विकोपाला गेले की श्रुती अनिकेतसोबत न राहता माहेरी निघून गेली. एवढेच नाही तर तिने अनिकेतच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. पत्नीच्या या वागणुकीमुळे आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे अनिकेत गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावाखाली होता. याच मानसिक तणावातून त्याने राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. अनिकेतच्या मृत्यूनंतर सुरुवातीला कॅम्प पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद केली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी पोलिसांत गंभीर आरोप करत लेखी तक्रार दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रुती जगताप (पत्नी), वंदना सुभाष धिवरे (सासू), सुभाष सुकदेव धिवरे (सासरे), उज्वला सतीश पवार (मामे सासू) या चार जणांवर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे: कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनिकेतचे सासरे (सुभाष धिवरे) आणि सासू (वंदना धिवरे) यांना अटक केली आहे. मात्र, पत्नी श्रुती आणि मामे सासू उज्वला पवार या दोघी अद्याप फरार आहेत. अवघ्या २७ वर्षांच्या लेकाने सासरच्या जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याने जगताप कुटुंब प्रचंड आक्रमक झाले आहे. “फरार असलेल्या पत्नीला आणि मामे सासूला तत्काळ अटक करा, अन्यथा आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू,” असा थेट इशारा मृत अनिकेतच्या कुटुंबीयांनी दिला आहे. पोलिसांचा तपास सुरू कॅम्प पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच आत्महत्येमागील नेमकी कारणे, दोन्ही कुटुंबांमधील वादाचे स्वरूप आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मालेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अवघ्या वर्षभराच्या संसारानंतर एका तरुणाने आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Source link
पत्नीच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय तरुणाची नाशिकमध्ये आत्महत्या:'तिला तत्काळ अटक करा, अन्यथा आत्मदहन करू', संतप्त कुटुंबीयांचा इशारा