![]()
परभणी शहरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका थरारक घटनेत दोन युवकांनी प्रसंगावधान दाखवत एका चिमुकल्याचा जीव वाचवला. वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावरील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने सायकल चालवत जाणारा मुलगा थेट खड्ड्यात अडकला. मात्र, जवळच उभ्या असलेल्या दोन युवकांनी क्षणाचाही विलंब न करता खड्ड्यात उतरून चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गंगाखेड रोडवरील धक्कादायक प्रकार ही घटना परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील शांतिनिकेतन कॉलनीजवळ घडली. सोमवारी दुपारी शहरात सुमारे अर्धा ते एक तास मुसळधार पाऊस झाला. गंगाखेड रोड उतारावर असल्याने विविध भागातील पावसाचे पाणी मोठ्या वेगाने या रस्त्यावरून वाहत होते. शांतिनिकेतन कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर मोठा खड्डा असून त्यामध्ये पाइप टाकण्यात आला आहे. मात्र, हा खड्डा अनेक दिवसांपासून उघडाच असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा खड्डा पूर्णपणे झाकला गेल्याने सायकलवरून जाणाऱ्या एका चिमुकल्याला त्याचा अंदाज आला नाही आणि तो थेट सायकलसह खड्ड्यात कोसळला. दोन युवक देवदूत ठरले घटना घडताच तेथे उभे असलेले स्वप्निल कदम आणि विजय घोडे यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन पाच ते सहा फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या चिमुकल्याला बाहेर काढले. पाण्याचा वेग अधिक असतानाही दोघांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही क्षणांचा उशीर झाला असता तर मुलाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती. CCTV मध्ये कैद झाला थरार संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये चिमुकला अचानक पाण्याखालील खड्ड्यात अडकताना आणि त्यानंतर दोन्ही युवकांनी धावत जाऊन त्याला बाहेर काढतानाचे थरारक दृश्य स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, स्वप्निल कदम आणि विजय घोडे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांची तक्रार शांतिनिकेतन कॉलनी परिसरात पावसाळ्यात वाहत्या पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून कायम असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी उघडा खड्डा असल्याबाबत महापालिका प्रशासनाला अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी उघडे खड्डे, तुटलेले रस्ते आणि वाहत्या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, प्रत्येक वेळी मदतीला या तरुणांसारखे देवदूत धावून येतीलच, याची खात्री नाही. त्यामुळे उघडे खड्डे तातडीने बुजवून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
Source link
परभणीत सजग तरुणांनी वाचवले चिमुकल्याचे प्राण:थरारक घटना CCTV मध्ये कैद, भरपावसात खोल खड्ड्यात सायकलसह अडकलेल्या चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून खेचून आणले