![]()
वेळ दुपारची. सिडको परिसरात राहणाऱ्या १९ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीच्या इन्स्टाग्रामवर एक मेसेज धडकला. ‘मैत्री करशील का?’ अशी विचारणा तरुणानं केली. तिनं तरुणाला नकार दिला. मात्र, समोरचा तरुण इरेला पेटला. रात्री आठपर्यंत मेसेजचा भडिमार करत त्यानं ‘आपण वेरूळ-खुलताबादला फिरायला जाऊ,’ असा तगादा लावला. तिनं या त्रासाला कायमचा पूर्णविराम देण्याचे ठरवलं. ‘आई बाहेरगावी जाऊ देणार नाही, आपण शहरातच भेटू,’ असा मेसेज पाठवून तिनं त्याला विश्वासात घेतलं आणि दुसरीकडं आपल्या मावस व आतेभावांना याची कल्पना दिली. आरोपीही सावध होता. त्यानं आधी टीव्ही सेंटरच्या साई मैदानावर बोलावले आणि तासाभरानं ‘तिथं ओळखीची मुलं आहेत,’ असं सांगत एम-टू रोडवरील एका कापड दुकानाजवळ ठिकाण बदलले. तरुणीनं क्षणाचाही विलंब न लावता नवं लोकेशन भावांना कळवलं. ठरल्याप्रमाणं विशाल शिवाजी मुरमुडे (२१, व्यवसाय सोलार इन्स्टॉलेशन, रा. हर्सूल सावंगी, मूळ रा. वाकोद, ता. कन्नड) दुचाकीवरून (एमएच २० एचयू ६७७३) तिथं आला. ‘गाडीवर बस, पुढे जाऊन पाणीपुरी खाऊ,’ असं तो म्हणताच आसपास दबा धरून बसलेल्या तिच्या ३ भावांनी झडप घालून त्याला पकडलं. दुचाकी आणि मोबाइलसह त्याला थेट सिडको पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलं. तरुणीच्या फिर्यादीवरून रविवारी (२२ नोव्हेंबर) मध्यरात्री त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मोबाइल, कॉल लॉग व सोशल मीडियातील संवाद आदी ताब्यात घेतलं असून, हवालदार विमल पवार पुढील तपास करत आहेत.
Source link
‘पाणीपुरी खाऊ,’ म्हणाला अन् तिच्या भावांनी चोपले:छत्रपती संभाजीनगरात सोशल मीडियातून त्रास देणाऱ्याला शिकवला धडा