Headlines

प्रवाह अनाथालयामधील 30 मुलांना दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट:चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद




पैठण दिवाळी म्हटली की प्रत्येक घरात नवीन कपडे, फराळ, फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदाची लगबग सुरू असते. मात्र, आई-वडिलांच्या मायेपासून वंचित असलेल्या अनाथाश्रमातील चिमुकल्यांसाठी सणाचा आनंद नेहमीच काहीसा वेगळा असतो. या मुलांच्या आयुष्यातही दिवाळीचे रंग खुलावेत, त्यांनाही आपल्या आवडीचे नवे कपडे निवडण्याचा निवांत आनंद मिळावा, या संवेदनशील भावनेतून खासदार संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विलासबाप्पू भुमरे प्रतिष्ठानाने यंदा माणुसकीचा दिवा प्रज्वलित केला आहे. टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार अनाथाश्रमातील ३० मुलांसोबत दिवाळी साजरी करताना केवळ कपड्यांचे औपचारिक वाटप न करता, त्यांना थेट दुकानात नेऊन त्यांच्या आवडीनुसार कपड्यांची खरेदी करण्यात आली. या अनोख्या आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हीच या दिवाळीची खरी श्रीमंती ठरली. आमदार विलास भुमरे यांनी पैठण शहरातील कपड्यांच्या दुकानात मुलांना स्वतःसोबत नेले. तेथे प्रत्येक चिमुकल्याला आपल्या पसंतीचे कपडे निवडण्याची संधी देण्यात आली. नवीन कपडे निवडताना मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह, कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत चमकलेला आनंद आणि चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरले. एरवी सणासुदीला घरातील लहान मुलांसाठी आवडीचे कपडे खरेदी करण्याची लगबग प्रत्येक कुटुंबात पाहायला मिळते. पैठण येथे आमदार विलासबाप्पू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने मुलांना दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्यात आले. आमदार भुमरे यांनी चिमुकल्या मुलांशी साधला आपुलकीने संवाद सणासुदीच्या काळात गरजू घटकांना निरनिराळ्या वस्तूंचे वाटप करणारे उपक्रम समाजोपयोगी म्हणून राबवले जातात. मात्र, मुलांना त्यांच्या आवडीनुसार कपडे स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देत त्यांच्यासोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना समाजातील आपलेपणाची जाणीव करून देणे, ही या उपक्रमाची वेगळी बाजू ठरली. अनाथाश्रमातील मुलांच्या आयुष्यात सणाचा आनंद निर्माण करण्याबरोबरच त्यांच्याशी मायेचे घट्ट नाते जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून झाला. दिवाळीचा खरा अर्थ केवळ घरातील दिव्यांच्या रोषणाईत नसून, दुसऱ्याच्या अंधारमय आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, याची प्रचिती या उपक्रमातून सर्वांना आली. हाच कौटुंबिक आनंद आणि आपुलकी या चिमुकल्यांनाही अनुभवता यावी, हा उपक्रमामागील मुख्य विचार होता. उपक्रमाप्रसंगी आमदार विलास भुमरे, अप्पासाहेब निर्मळ, विनोद बोंबले, शेखर शिंदे, ईश्वर दगडे, कविता शिंदे, वैशाली परदेशी, जयश्री गायकवाड, भारती मिटकर, राजू गायकवाड, जालिंदर अडसूळ, जनार्दन मिटकर, अजित पगारे, राज मानधने, महेश गाडे, ऋषिकेश दहिभाते, भारत कासोदे, रविराज क्षीरसागर, आशिष गिरे, मनीष औटे, दिनेश खंडागळे, गणेश वाघमोडे, प्रीतम अडसूळ, रशीद शेख, ज्ञानेश्वर बेडके, अनाथालयाचे संचालक रामेश्वर गोरडे, हेमलता गोर्डे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *