Headlines

50 हजार रुपयांच्या हुंड्यासाठी छळ; महिलेची गळफास घेऊन आत्महत्या:वैजापूर तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील घटना; पाच जणांवर गुन्हा




नव्या संसाराची स्वप्ने फुलण्याआधीच एका २१ वर्षीय नवविवाहितेचे आयुष्य संपले. लग्नाला अवघे सहा महिने झाले असताना हुंड्यातील उर्वरित ५० हजार रुपयांसाठी सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे घडली. शुभांगी गौरव वाघचौरे (२१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच पैशांसाठी तिचा छळ सुरू झाल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शुभांगीचा सहा महिन्यांपूर्वी गाढेपिंपळगाव येथील गौरव वाघचौरे याच्याशी विवाह झाला होता. आई-वडिलांनी सुखी संसाराच्या अपेक्षेने लेकीची सासरी पाठवणी केली होती. मात्र, लग्नानंतर महिनाभरातच हुंड्यातील राहिलेल्या पैशांवरून तिच्या संसारात वादाची ठिणगी पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शुभांगीची आई नीता रवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माहेरून उर्वरित ५० हजार आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिच्याकडे वारंवार तगादा लावण्यात येत होता. पैसे आणले नाहीत म्हणून शिवीगाळ, मानसिक व शारीरिक त्रास देण्यासह जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुभांगीच्या आईच्या फिर्यादीवरून पती गौरव संजय वाघचौरे, संजय लक्ष्मण वाघचौरे, विमल संजय वाघचौरे, नवनाथ संजय वाघचौरे आणि शितल नवनाथ वाघचौरे (सर्व रा. गाढेपिंपळगाव) यांच्याविरुद्ध विरगाव ठाण्यात गुन्हा दाखल आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *