Headlines

बंटी दीक्षित खून प्रकरण:रामलीला मैदानावर रावणदहन कार्यक्रमात बंटीला गोळ्या घालून मारण्याचा होता डाव, गावठी कट्टा जप्त




सिडकोतील एन-७ परिसरात भररस्त्यात बंटी दीक्षितचा खून केल्यावर पवन पराशर स्वतःहून सिडको ठाण्यात शरण आला होता. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) न्यायालयात हजर केल्यावर त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. ‘बंटी माझ्या कामांत अडथळा ठरत होता. त्याला तोच भाई वाटायचा, मी पण काही कमी नाही हेच मला सिद्ध करायचं होतं,’ असे आरोपी पवन पोलिस कोठडीत बडबडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारने धडक आणि त्यानंतर लाकडी दांड्याने प्रहार करून खून करणाऱ्या पवनचा मूळ प्लॅन वेगळाच होता. तो दसऱ्याच्या दिवशी बंटीला गोळ्या घालणार होता. दरम्यान, दुपारी सेंट्रल नाका स्मशानभूमीत देवेश ऊर्फ बंटी दीक्षित यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नागरिकांची गर्दी होती. खून केल्यावर एन-८ पर्यंत फिरला बंटीची हत्या केल्यावर त्याच चौकातून सरळ ठाण्यात न जाता पवन तेथून समोर एन-८ येथील सरकारी रुग्णालयाच्या गल्लीत गेला. या गल्लीतील मोकळ्या मैदानात त्याने चालत्या गाडीतूनच गाडीतील कट्टा व ८ काडतुसे फेकली. कट्टा रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात पडला. त्यामुळे तो कुणाला दिसला नाही. मात्र, चौकशीत त्याने आपला ठाण्यात येण्याचा मार्ग दाखवल्यावर उपनिरीक्षक अनिल नाणेकर, अंमलदार मंगेश पवार यांच्या पथकाने पाहणी केल्यावर त्यांनी तेथून कट्टा व ८ काडतुसे हस्तगत केली. बंटी वरचढ ठरत असल्याचा राग बंटी वादात सातत्याने वरचढ ठरत असल्याने शेकडो लोकांसमोरच त्याला मारण्याचा निश्चय त्याने केला होता. रामलीला मैदानावर रावणदहन कार्यक्रमात बंटी सक्रिय असतो. त्याला तेथेच गर्दीत गोळ्या घालून संपवण्याचा त्याचा डाव होता. त्यासाठी पवनने दांडियाला हजेरी लावून मैदानाची रेकी केली होती. मात्र, दसऱ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त तैनात होता. तगडा बंदोबस्त व प्रकरणाला वेगळे वळण लागून आपली हवा होणार नाही, हे लक्षात घेऊन त्याने तो प्लॅन रद्द केला. इनसाइड स्टोरी: सुनियोजित कट; आरोपी वाढण्याची शक्यता पवन याच्या चौकशीत खून हा एक सुनियोजित कट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे त्याने कुणाच्या सांगण्यावरून अथवा कुणाच्या मदतीने हा प्लॅन केला आहे, या दृष्टीने तपास सुरू आहे. त्याचबरोबर पोलिसांना मिळालेल्या माहितीमध्ये गेल्या आठवडाभरापासून काही मंडळी बंटीचा पाठलाग करत होती. याची कुणकुण बंटीला लागली होती. त्याने तशी चर्चादेखील कुटुंबात केली होती. त्यामुळे पोलिस पवनच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील चौकशी करणार आहेत. यात प्रामुख्याने एक कथित डॉन व एक सामाजिक कार्यकर्ता असून दोघेही सध्या शहराच्या बाहेर लपून बसल्याची माहिती असल्याने संशय बळावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *