Headlines

महाराष्ट्रातील आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट:पिकांचे 20% सर्वेक्षण करण्याचे आदेश, कर्जवसुलीत सक्तीला मनाई




राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता दुष्काळाची तीव्रता जाणवत असलेल्या आणखी 19 तालुक्यांकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे. या तालुक्यांमध्ये पिकांची स्थिती आणि प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने सर्वेक्षण आणि ग्राउंड ट्रथिंग करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यामुळे या 19 तालुक्यांनाही दुष्काळी सवलती मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. विविध भागांतील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या 19 तालुक्यांमध्ये प्रमुख पाच पिकांच्या क्षेत्राचे 20 टक्के सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांचा सर्व्हेत समावेश? सरकारच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर, चंद्रपूरमधील जिवती, ब्रह्मपुरी आणि बल्लारपूर, गोंदियातील आमगाव, देवरी, सालेकसा आणि गोंदिया या तालुक्यांचा सर्वेक्षणात समावेश आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील कारंजा, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड, साताऱ्यातील पाटण, तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा या तालुक्यांमध्येही पिकांची पाहणी केली जाणार आहे. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती नको दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या बाबतीतही दिलासा देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आले आहेत. खासगी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी शेतकरी किंवा नागरिकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा सक्ती करू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना सहकार विभागाला देण्यात आल्या आहेत. यासाठी आवश्यक निर्देश जारी करण्याचेही सांगण्यात आले आहे. चारा टंचाई टाळण्यासाठी ‘सिलो’ व्यवस्थेचा पर्याय दुष्काळामुळे पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त चारा उपलब्ध असलेल्या भागातून चाऱ्याची गरज असलेल्या भागात तो पोहोचवण्यासाठी ‘सिलो’ व्यवस्थापनाचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुढील 15 दिवसांत याबाबत ठोस उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पारंपरिक चारा छावण्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांना लहान टँकरनेही पाणीपुरवठा दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये रस्त्यांची परिस्थिती किंवा इतर अडचणींमुळे मोठ्या क्षमतेचे टँकर पोहोचणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी लहान क्षमतेच्या टँकरचा वापर करून पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना दुष्काळी परिस्थितीत मदतकार्य आणि प्रशासनाची यंत्रणा वेगाने कार्यरत राहावी, यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी, चारा, पीकस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत स्थानिक पातळीवर तातडीने कार्यवाही करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. दरम्यान, सध्या राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आता नव्याने सर्वेक्षणासाठी निवडलेल्या 19 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर प्रशासनाचा अहवाल काय येतो आणि त्यानंतर सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना:सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *