![]()
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या विक्री स्टॉलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी मिसाळ यांनी ‘प्रेरणापथ’ प्रकल्प अंधार आणि निराशेत जीवन जगणाऱ्या बंदी बांधवांच्या आयुष्यात उज्ज्वल भविष्याची नवी पहाट निर्माण करत असल्याचे सांगितले. कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण न राहता ते खऱ्या अर्थाने सुधारगृह बनावे, या उद्देशाने सुरू असलेल्या या कार्याला शासनातर्फे सर्व सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. हा विक्री स्टॉल गायत्री क्लिनिक, खडकमाळ, राष्ट्रभूषण चौक, पुणे येथे सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी बोलताना मिसाळ यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या काही दिवसांपासून येरवडा कारागृहातील बंदी बांधवांना जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणातून बंदी बांधवांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या सुंदर गणेशमूर्ती साकारल्या आहेत. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जात आहे. या उद्घाटन प्रसंगी अपर पोलिस महासंचालक तथा कारागृह सुधारसेवा विभागाचे प्रमुख डॉ. सुहास वारके, सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, कारागृह विभागाचे पोलिस महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुहास वारके यांनी यावेळी बोलताना सांगितले की, बंदी बांधवांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रेरणापथ’ प्रकल्पाला स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे आणि पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंददायी आहे. अशा उपक्रमांमुळे बंदी बांधवांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले. सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या कार्याचे कौतुक केले. केवळ समस्यांवर चर्चा न करता त्यांच्या मुळाशी जाऊन काम करणाऱ्या संस्था कमी असून, या संस्थांनी समाजासमोर एक स्तुत्य आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी माहिती दिली की, बंदी बांधवांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून त्यांच्यातील चांगल्या माणसाला घडविण्यासाठी ‘प्रेरणापथ’ प्रकल्प गेली बारा वर्षे राबविला जात आहे. बंदी बांधवांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींना मॉरिशसमधील गणेशभक्त, तालयोगी शिवमणी आणि संगीतकार आनंदजी यांनी खरेदी करून या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याची माहितीही त्यांनी दिली. आयोजकांच्या वतीने पुणेकरांना आवाहन करण्यात आले आहे की, पर्यावरणपूरक शाडू मातीच्या या गणेशमूर्ती खरेदी करून बंदी बांधवांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना हातभार लावावा.
Source link
येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींच्या स्टॉलचे उद्घाटन:माधुरी मिसाळ म्हणाल्या, 'प्रेरणापथ' कैद्यांच्या आयुष्यात नवी पहाट