Headlines

वाशिममध्ये अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई:दोन बहिणींच्या घरातून 88 किलो चांदी, 13 लाखांची रोकड जप्त




वाशिम शहरात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन महिला सावकारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या झडतीत तब्बल 88 किलो चांदीच्या विटा आणि बिस्किटे, तसेच 13 लाख 300 रुपयांची रोकड आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या चांदीची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे वाशिम शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सहकार विभाग आणि पोलिसांनी प्रिया दौलतराव वायचाळ आणि अलका दौलतराव वायचाळ या दोन बहिणींच्या घरांवर कारवाई केली. राजगाव तसेच वाशिम शहरातील शंकरबाबा रोड परिसरातील घरांमध्ये ही तपासणी करण्यात आली. अवैध सावकारी व्यवहाराबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बॅगेत सापडल्या चांदीच्या विटा आणि बिस्किटे घराची झडती घेत असताना अधिकाऱ्यांना एका बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीच्या विटा आणि बिस्किटे आढळून आली. एकूण 88 किलो चांदी जप्त करण्यात आली असून, तिची बाजारातील अंदाजे किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच घरातून 13 लाख 300 रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात चांदी आणि रोकड आढळल्याने तपास यंत्रणांकडून या मालमत्तेच्या स्रोताची माहिती घेतली जात आहे. चांदी आणि रोकड नेमकी कोणत्या व्यवहारातून जमा झाली, याचा तपास आता केला जाणार आहे. कोरे धनादेश, मालमत्तेची कागदपत्रेही जप्त झडतीमध्ये केवळ चांदी आणि रोकडच नव्हे, तर सावकारी व्यवहाराशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रेही अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. यामध्ये कोरे निनावी धनादेश, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, खरेदीखत, करारनामे आणि कोरे बाँड यांचा समावेश आहे. याशिवाय सावकारी व्यवहाराशी संबंधित रजिस्टर आणि इतर कागदपत्रेही तपास पथकाने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांमधून संबंधित महिलांकडून कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार केले जात होते, याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. सावकारी व्यवहाराचा तपास सुरू या कारवाईनंतर दोन्ही महिलांकडे आढळून आलेली मोठी मालमत्ता आणि चांदीचा साठा याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू होता का, तसेच या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, धनादेश आणि रजिस्टर तपासल्यानंतर सावकारी व्यवहाराचे स्वरूप आणि आर्थिक देवाणघेवाणीची माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… महाराष्ट्रातील आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट:पिकांचे 20% सर्वेक्षण करण्याचे आदेश, कर्जवसुलीत सक्तीला मनाई राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता दुष्काळाची तीव्रता जाणवत असलेल्या आणखी 19 तालुक्यांकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे. या तालुक्यांमध्ये पिकांची स्थिती आणि प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने सर्वेक्षण आणि ग्राउंड ट्रथिंग करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यामुळे या 19 तालुक्यांनाही दुष्काळी सवलती मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *