![]()
कार्तिकी यात्रेच्या सांगतेनिमित्त श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी शुभमुहूर्तावर विधिवत संपन्न झाली. या पूजेनंतर श्रींची काकड आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती आणि शेजारती यांसह सर्व नित्य राजोपच
.
कार्तिकी एकादशी दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. परंपरेनुसार योग्य मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढण्यात येतो. त्यामुळे भाविकांना चोवीस तास अखंड दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देता येते. त्यानुसार दि. १४ नोव्हेंबर रोजी नियमित राजोपचार स्थगित ठेवण्यात आले होते. शनिवारी झालेल्या प्रक्षाळपूजेत मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची, तर व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या हस्ते श्री रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली. पूजेच्या प्रारंभी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठलास प्रथम स्नान घालण्यात आले. त्यानंतर धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारात प्रक्षाळपूजेचे सर्व सोपस्कार पार पडले.
प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम, निळाचा कौस्तुभमणी, दंडपेठ्याजवळ हिऱ्याचे कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी तुळशीची माळ, शिरपेच, तोडे जोड, जवेची माळ आणि एकदाणी आदी अलंकार परिधान केले. श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुखवटा, वाक्या, तोडे जोड, चांदवड रोड, चिंचपेटी, तांबडी जवमणी, पदक, जवाच्या माळा, तुळशीची माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल सरी आणि कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करून पारंपरिक साजशृंगार करण्यात आला.
प्रक्षाळ पूजेचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि मंदिर परिसरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. अमोल शेरे व अभिजित मोहिते यांच्या सहकाऱ्यांनी ही सजावट केली असून, त्यासाठी सुमारे ५ हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला. गुलाब, झेंडू, शेवंती, लिली, गलांडा, आष्टर, ऑर्किड, गॅलोडा, जिनो, कार्नेशियन अशा ३० हून अधिक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांसह विविध आकर्षक पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला. विविध रंगसंगती आणि कलात्मक पुष्परचनांमुळे श्री विठ्ठल मंदिर, श्री रुक्मिणी माता मंदिर तसेच मंदिर परिसराला मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते.