![]()
डिसेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणाऱ्या 12 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सिद्धहस्त लेखिका इंदुमती जोंधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषद, शाखा- अंबाजोगाईच्या कार्यकारिणी बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून शकुंतलाताई लोमटे यांची यापुर्वीच निवड करण्यात आली आहे. प्रख्यात लेखिका इंदुमती जोंधळे ह्या आंबाजोगाईजवळ असलेल्या मोरवड या गावात जन्मलेल्या. त्यांचे पती जेष्ठ संपादक, लेखक महावीर जोंधळे हे आंबाजोगाईचे, इंदुमती जोंधळे यांचे बिनपटाची चौकट (आत्मकथन), अस्वस्थ श्वासांची डायरी व पाषाणनिद्रा (कथासंग्रह ), फुलझडी (नाटक), इत्यादी साहित्य प्रकाशित असून बेदखल या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांनी दीर्घकाळ शिक्षक म्हणून नोकरी केली. संभाजीनगर येथील सरस्वती भुवन विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्या निवृत्त झाल्या. अध्यक्ष निवडीची पद्धत पूर्वाध्यक्ष नूतन अध्यक्षाचे नाव सुचवतात. त्यांनी सुचवलेल्या नावाचा बंद लिफाफा मसाप शाखा, अंबाजोगाईच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उघडला जातो. त्या नावावर कार्यकारिणीचे एकमत झाले तरच ते नाव जाहीर केले जाते. एखाद्याने जरी विरोध दर्शविला तर मात्र निवडणूक घेऊन अध्यक्ष ठरवला जातो. या निवडणूकीत मसापचे अंबाजोगाई येथील आजीव सभासद व पहिले शंभर स्वागत सभासद मतदान करू शकतात. आतापर्यंत कधीच मतदानाची वेळ आली नाही. यावेळी पूर्वाध्यक्ष बालाजी सुतार यांनी इंदुमती जोंधळे यांचे नाव सुचवले त्यावर कार्यकारिणीचे एकमत झाले. 12 व्या अंबाजोगाई सा. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस मसाप अंबाजोगाईचे अध्यक्ष.डॉ. राहुल धाकडे, जेष्ठ मार्गदर्शक अमर हबीब, केंद्रीय सदस्य दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्रा. शैलजा बरुरे, सचिव गोरख शेंद्रे, सहसचिव भागवत मसने, कोषाध्यक्ष मंजुषा कुलकर्णी, सदस्य अनिरुद चौसाळकर, संतोष मोहिते, प्रा सतीश घाडगे व तिलोत्तमा पतकराव हे उपस्थित होते. 11 संमेलनाध्यक्षाचा वारसा अंबाजोगाई मसाप शाखेचे वतीने दर दोन वर्षानी अंबाजोगाई साहित्य संमेलन घेण्यात येते. या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष क्रमवार खालीलप्रमाणे आहेत – प्रा.रंगनाथ तिवारी, प्राचार्य डॉ. शैला लोहिया, प्रा. रा.द. आरगडे, बलभीम तरकसे, प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर, डॉ. श्रीहरी नागरगोजे, मंदाताई देशमुख, गणपत व्यास, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. डॉ. दासू वैद्य व बालाजी सुतार. इंदुमती जोंधळे या तिसऱ्या महिला संमेलनाध्यक्ष आहेत.
Source link
संभाजीनगरात रंगणार 12 वे अंबाजोगाई साहित्य संमेलन:अध्यक्षपदी इंदुमती जोंधळे, तर स्वागताध्यक्षपदी शकुंतलाताई लोमटे