![]()
निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कारभारावर आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर सध्या राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. संविधानाचा १०० टक्के विश्वासघात झाला असून, मुख्य निवडणूक आयुक्तांचे वर्तन भाजपला मदत करणारे असल्याचा दावा करत त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये फेरनिवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ‘संविधानिक विश्वासाचा १०० टक्के विश्वासघात’ पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाचा संदर्भ दिला आहे. “पंतप्रधानांवर आणि राज्यकर्त्यांवर ठेवलेल्या ‘संविधानिक विश्वासाचा’ प्रत्यक्ष व्यवहारात विश्वासघात झाला आहे का?” या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने ‘‘होय, १०० टक्के विश्वासघात झाला’’, असेच द्यावे लागेल, असे पवार यांनी म्हटले आहे. हा केवळ विश्वासघात नसून घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवून लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘निवडणूक आयुक्तांचे वर्तन भाजपला जिंकवण्यासाठीच’ संविधान बदलण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारे पाशवी बहुमत मिळवण्यासाठी भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रयत्न करत असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे वर्तन हे भाजपला जिंकवण्यासाठीच होते, हे स्पष्ट होत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला. घटनात्मक स्वायत्तता असलेल्या संस्थांनी सरकारच्या हातातील बाहुले न बनता संविधानाने दिलेल्या नैतिकतेचे पालन केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फेरनिवडणुकांची मागणी आणि Gen-Z चे कौतुक निवडणूक आयोगाच्या या संशयास्पद कारभारामुळे महाराष्ट्र, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये फेरनिवडणुका का होऊ नयेत? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. तसेच, लोकशाहीवरील विश्वास टिकवण्यासाठी जनतेने आवाज उठवला पाहिजे असे सांगत, आज हा आवाज बुलंद होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या लढ्यात ‘Gen-Z’ आघाडीवर असून, जनता आणि न्यायव्यवस्थेतील व्यक्तीही न घाबरता बोलत आहेत, ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी.. निवडणूक आयोगाचा कारभार आणि पारदर्शकतेवर आज निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह पाहता “पंतप्रधानांवर आणि राज्यकर्त्यांवर ठेवलेल्या ‘संविधानिक विश्वासाचा’ प्रत्यक्ष व्यवहारात विश्वासघात झाला आहे का?” या सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने ‘‘होय, १०० टक्के विश्वासघात झाला’’, असंच द्यावं लागेल. हा प्रश्न केवळ विश्वासघातापुरताच मर्यादीत नाही तर घटनात्मक संस्थांवर ताबा घेऊन लोकशाही व संविधान धोक्यात आणण्याचाही हा प्रयत्न आहे आणि गेल्या काही वर्षांत दुर्दैवाने तो यशस्वी होताना दिसतोय. घटनात्मक स्वायत्तता असलेल्या संस्थांनी सरकारच्या हातातील बाहुलं न बनता संविधानाने दिलेल्या नैतिकतेचं पालन केलं पाहिजे, तरच जनतेचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहील, ही संविधानकर्त्यांची अपेक्षा नक्कीच योग्य आहे पण त्यासाठी जनतेनेही आवाज उठवला पाहिजे. समाधानाची बाब म्हणजे हा आवाज आज बुलंद होतोय आणि यात Gen-Z पण आघाडीवर आहे, तसंच जनता आणि न्यायासनावरील व्यक्तीही न घाबरता बोलतायेत, हेही महत्त्वाचं आहे. संविधान बदलण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारं पाशवी बहुमत मिळवण्यासाठी तर भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरुन प्रयत्न करत नाही ना? याच प्रयत्नाचा भाग म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचं आज उघडकीस आलेलं वर्तन हे भाजपाला जिंकवण्यासाठीच होतं हे स्पष्ट होतं. अशा परिस्थितीत महाराष्ट्र, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यात फेरनिवडणुका का होऊ नयेत? हेही वाचा.. पुढच्या वर्षी लवकर या!: राज्यभरात अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह, मुंबई-पुण्यात ढोल-ताशांचा गजर; 5 कोटी भाविक रस्त्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. सविस्तर वाचा
Source link
संविधानाचा 100 टक्के विश्वासघात झाला:निवडणूक आयोगावरून रोहित पवारांचा घणाघात, फेरनिवडणुकीची मागणी