![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला वाद आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा उफाळून आला आहे. राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानाला मिश्कील शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे त्यांनाच विचारावे लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन,’ असा टोला देसाईंनी लगावला. त्यामुळे साताऱ्यातील महायुतीमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. या राजकीय संघर्षादरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडला होता. या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर देसाई यांनी या जुन्या वादाचा उल्लेख करत विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात; मात्र त्या खोलवर असतील तर त्या लवकर भरून येत नाहीत. त्यासाठी जालीम औषध घ्यावे लागते, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख जयकुमार गोरे यांच्याकडे असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली. जयकुमार गोरेंचा ‘अघोरी विद्ये’चा उल्लेख शंभूराज देसाई यांच्या जालीम औषधाच्या विधानावर मंत्री जयकुमार गोरे यांनीही प्रत्युत्तर दिले होते. जखमा खोलवर असतील तर त्यांच्यावर योग्य औषधोपचार करणे आवश्यक असते. मात्र, काही वेळा अघोरी विद्येच्या माध्यमातून जखम बरी करण्याचा प्रयत्न केला, तर ती बरी होण्याऐवजी त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, असे गोरे म्हणाले होते. गोरेंच्या या विधानामुळे दोन्ही मंत्र्यांमधील शाब्दिक संघर्षाला आणखी धार आली. आता याच विधानावर देसाई यांनी प्रतिक्रिया देताना अघोरी बाबाचा उल्लेख केला. ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे जयकुमार गोरे यांनाच विचारावे लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन,’ असे म्हणत त्यांनी गोरेंना मिश्कील टोला लगावला. ‘दम होता तर निवडणूक एकट्याने लढवायची’ या विधानालाही प्रत्युत्तर जयकुमार गोरे यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या मुद्द्यावरूनही देसाईंना लक्ष्य केले होते. दम असेल तर निवडणूक एकट्याने लढवून दाखवावी, अशा आशयाचे आव्हान त्यांनी दिले होते. या विधानावरही शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही कधीही दमाची भाषा केलेली नाही. मात्र, कोणी वारंवार अशा प्रकारची भाषा करत असेल, तर निवडणुकीतील आकडेवारी सर्व काही स्पष्ट करते. या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे देसाई यांनी सांगितले. केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा निवडणुकीतील प्रत्यक्ष निकाल आणि आकडेवारीच्या आधारे वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असा त्यांचा युक्तिवाद होता. 11 पैकी 7 जागांवर युतीचा विजय; देसाईंचा दावा आपली बाजू भक्कम असल्याचा दावाही शंभूराज देसाई यांनी केला. तालुक्यातील 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने विजय मिळवला आहे. तसेच जिल्हा गटातील 5 जागांवरही हेच ठरावधारक मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपली भूमिका मजबूत असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल सर्वच पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. जयकुमार गोरे हे मंत्रिमंडळातील आपले सहकारी आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या विधानावर अधिक भाष्य करणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. एकीकडे राज्यात महायुतीचे सरकार असताना सातारा जिल्ह्यात मात्र भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील मतभेद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू झालेला हा संघर्ष आता जिल्हा बँकेच्या राजकारणातही दिसत आहे. त्यामुळे शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यातील हा शाब्दिक सामना आगामी काळात कोणते वळण घेतो, याकडे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. अदाणींच्या तारळी प्रकल्पाला दुहेरी दणका:वनविभागानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही काम बंदचे आदेश, परिसरात ‘नो एन्ट्री’चे फलक सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या अदाणी ग्रीन एनर्जीच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवत वनविभागाने यापूर्वीच प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही सावरघर येथील उत्खनन आणि बांधकामाला तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरणविषयक आवश्यक पूर्वपरवानगी न घेता काम सुरू असल्याचे निरीक्षण मंडळाने नोंदवले आहे. दरम्यान, कंपनीनेही सावरघर येथील संबंधित कामे तात्पुरती थांबवली असून, तारळी धरण परिसरात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि ‘नो एन्ट्री’चे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाभोवतीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…..
Source link
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे जयकुमार गोरेंनाच विचारा':DCC बँकेच्या वादातून शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला