Headlines

बुलढाण्यात शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार:बोगस डॉक्टरसह तिघे रंगेहात पकडले




गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कायद्याने कठोर निर्बंध असतानाही राज्यात असे गैरप्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर या गैरप्रकाराने धक्कादायक पातळी गाठली आहे. चक्क शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात एका बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याविरोधात अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतातील गोठ्यात सुरू होता गर्भलिंग निदानाचा प्रकार गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी केंद्र किंवा रुग्णालयाचा वापर केला जात असल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र, बुलढाण्यातील प्रकार अधिक धक्कादायक आहे. चिखली तालुक्यातील अमडापूर-लव्हाळा मार्गावरील एका शेतात हा गैरप्रकार सुरू होता. गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ठेवून गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी पथकासह कारवाईचे नियोजन केले. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. आरोग्य विभागाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या रॅकेटपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली. त्यानंतर शेतातील गोठ्यात प्रत्यक्ष गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याचे आढळून आले. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाची थेट कारवाई डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. शेतातील गोठ्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकाराचा पर्दाफाश करत एका बोगस डॉक्टरसह तिघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करून गर्भलिंग निदान केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित तिघांविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा अर्थात PCPNDT कायद्यानुसार तसेच इतर विविध कलमान्वये अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकारामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास होण्याची शक्यता आहे. बीडमध्येही बोगस डॉक्टरवर कारवाई दरम्यान, गेल्या महिन्यात बीड शहरातही बोगस डॉक्टरचा प्रकार उघडकीस आला होता. शहरातील मध्यवर्ती भागात आलिशान दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली होती. ऋषिकेश कानडे असे या बोगस डॉक्टरचे नाव होते. बीडमधील संत भगवान बाबा चौक परिसरात असलेल्या संजीवनी नस क्लिनिकमध्ये आरोग्य विभागाने तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय शिक्षणाची अधिकृत पात्रता नसतानाही तो बनावट पदवीच्या आधारे रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले होते. तपासणीदरम्यान क्लिनिकमध्ये बनावट औषधे आणि उपचारांसाठी वापरले जाणारे साहित्यही आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम राबवली जात आहे. गर्भलिंग निदानाच्या प्रकारांमुळे पुन्हा प्रश्नचिन्ह एकीकडे मुलींच्या जन्मदरात सुधारणा व्हावी, स्त्रीभ्रूणहत्या थांबावी यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची तरतूदही आहे. असे असतानाही शेतातील गोठ्यासारख्या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भलिंग निदान केले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीवर आणि अशा अवैध व्यवसायांच्या नेटवर्कवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बुलढाण्यातील या कारवाईनंतर आता या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, या प्रकारात आणखी कोण सहभागी आहे आणि अशा प्रकारे इतर ठिकाणीही गर्भलिंग निदान केले जात होते का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.हेही हेही वाचा…. जिओ-टॅगिंगलाच 5 हजार खर्च, मग शेतकऱ्यांना मदत कसली?:कापसावर 20 टक्के आयात शुल्क लावा, अन्यथा नागपुरातून ‘टार्गेट ओरिएंटेड’ आंदोलन; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दुष्काळ निवारण कार्यक्रमाचा पूर्णपणे खेळखंडोबा केला आहे. शेतकऱ्यांना स्वतःहून जिओ-टॅगिंग करण्यास सांगितले जात असून त्यासाठीच किमान 5000 रुपये खर्च येतो, आणि सरकारने जाहीर केलेली मदतही केवळ 5000 रुपयेच आहे—तीसुद्धा अद्याप मिळालेली नाही,” असा घणाघात आंबेडकर यांनी केला. तसेच, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने आयात होणाऱ्या कापसावर तात्काळ 20 टक्के आयात शुल्क (इम्पोर्ट ड्युटी) लागू करावे; यासाठी सरकारला 10 ते 15 दिवसांची मुदत देत असून, निर्णय न झाल्यास नागपुरातून थेट ‘टार्गेट ओरिएंटेड’ आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *