Headlines

96 दगडी खांबांवर उभे कमलाभवानी मंदिर; दाक्षिणात्य स्थापत्य कलाविष्कार:3 दीपमाळा, बारव, काळ्या पाषाणात सुबक कोरीव काम




करमाळा शहराची ऐतिहासिक ओळख आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कमलाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा एक ठेवा असलेल्या या काळ्या पाषाणातील ९६ खांबांवर उभारलेले भव्य मंदिर आहे. उंचच उंच तीन दीपमाळा, चार देखणी गोपुरे, दगडी तटबंदी, ओवऱ्या आणि ऐतिहासिक बारव अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे मंदिर उठून दिसते. मराठा आणि दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा सुंदर संगम असलेल्या या मंदिराचे सौंदर्य नवरात्रोत्सवाच्या काळात अधिकच खुलून दिसते. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक येथील मंदिराच्या भव्य वास्तुकलेचाही अनुभव घेतात. मुख्य मंदिराची लांबी सुमारे ७५ फूट, तर रुंदी ६५ फूट आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा भागांत मंदिराची रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या शिखरावर देवदेवतांच्या प्रतिमा, फुलांचे नक्षीकाम, विविध आकृत्या आणि सुबक कलाकुसर पाहायला मिळते. काळ्या पाषाणातील बांधकाम आणि शिखरावरील कलात्मक सजावट यामुळे मंदिराला वेगळेच वैभव प्राप्त झाले आहे. १७४३ पर्यंत टप्प्याने काम करमाळा शहरातील श्री कमलाभवानी मंदिराचे बांधकाम राजे रावरंभा निंबाळकर आणि त्यांचे पुत्र राजे जानोजीराव निंबाळकर यांच्या काळात १७१७ ते १७४३ या कालावधीत टप्प्याटप्प्याने झाल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बांधकामात काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला असून, त्यातील ९६ दगडी खांब हे मुख्य आकर्षण आहे. येथील ऐतिहासिक बारव म्हणजे जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना मंदिर परिसरातील ऐतिहासिक बारव हे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या या बारवेत खाली उतरण्यासाठी ९६ पायऱ्या आहेत. अष्टकोनी विहीर, दगडी भिंती, कमानी, कोनाडे आणि हत्तीच्या मोटेची व्यवस्था ही त्या काळातील जलव्यवस्थापनाची साक्ष देतात. आजच्या आधुनिक जलव्यवस्थापनाच्या काळातही अशा वास्तू पाहताना पूर्वीच्या बांधकामातील नियोजन आणि पाण्याचे महत्त्व लक्षात येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *