![]()
प्रतिनिधी । मोर्शी भारतीय महाविद्यालय, मोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष आगरकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. काळे यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर महाविद्यालयातील बी.ए.प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मयुरी राठोडने संत गुलाबराव महाराज यांचे जीवनचरित्र, त्यांचे समाजप्रबोधनपर कार्य, ज्ञान,भक्ती आणि विवेकाचा संदेश तसेच महाराष्ट्र शासनाकडून त्यांची जयंती साजरी करण्यामागील उद्देश याविषयी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी संत गुलाबराव महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ज्ञान,अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.संतोष आगरकर यांनी संत गुलाबराव महाराज यांच्या जीवनकार्याचा गौरव करतांना सांगितले की, संत गुलाबराव महाराज यांचे अपंगत्व त्यांच्या ज्ञानसाधनेच्या आणि कार्याच्या कधीही आड आले नाही. दृढ इच्छाशक्ती,अखंड अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, वेद-उपनिषदे आणि अध्यात्माचा सखोल अभ्यास करून समाजाला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घालत विवेकनिष्ठ विचार समाजासमोर मांडले. आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करतांना अध्यात्मातील मानवी मूल्ये जपणे, हा त्यांचा संदेश आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून जिद्द, चिकाटी, ज्ञानाची उपासना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी आत्मसात करावी. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.लाजवंती टेंभुर्णे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गोपाल भलावी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संत गुलाबराव महाराज यांच्या ज्ञान, समता,विवेक, विज्ञाननिष्ठ विचार आणि मानवतेचा संदेश आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली. संत गुलाबराव महाराजांना अभिवादन करताना उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांसह इतर मान्यवर.
Source link
श्री संत गुलाबराव महाराज यांना अभिवादन:महाराजांचे जीवनचरित्र, समाजप्रबोधनपर कार्यास विद्यार्थ्यांनी दिला भाषणातून उजाळा